कल्याण : नियमित कारवाई करुनही कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अनेक दुकानदार, फेरीवाले, फळ, फूल विक्रेते प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करत असल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेच्या घनकचरा विभागाने प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दुकान मालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईतून गेल्या दोन दिवसात दोन लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.या कारवाईच्या वेळी घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील हे स्वता उपस्थित राहत आहेत. अडीच वर्षापासून कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करू नका म्हणून पालिकेने अनेक मोहिमा, उपक्रम राबविले तरी व्यापारी, फेरीवाले, फळ, फूल विक्रेते प्लास्टिकचा वापर करत असल्याने पालिका अधिकारी संतप्त झाले आहेत.
या कारवाईमुळे दुकानात चोरुन प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या या उल्हासनगर मधून खरेदी करुन आणल्या जातात अशी अधिकाऱ्यांची माहिती आहे.डोंबिवली, कल्याण मधील बाजारपेठ, बाजार समिती, भाजीपाला बाजार विभागात ही कारवाई नियमित केली जात आहे. पालिकेचे आरोग्य विभागाचे १० जणांचे पथक अचानक दुकानात जाऊन प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे का म्हणून तपासणी करते. या कारवाईत प्लास्टिक साठा पथकाला आढळून आला तर दुकानदाराला पाच हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत साठयाप्रमाणे दंड केला जात आहे, असे उपायुक्त अतुल पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा : डोंबिवली पश्चिम काही भागाचा वीज पुरवठा आज सात तास बंद
मागील अडीच वर्षाच्या काळात माजी घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांनी प्रतिबंधित प्लास्टिक मुक्त शहर म्हणून अभियान सुरू केले होते. या अभियानाचा चांगला परिणाम झाला होता. आरोग्य विभागाचे कर्मचारी मिळेल त्या माहिती प्रमाणे नियमित पहाटेच बाजार पेठांमध्ये जाऊन कारवाई करत होते. त्यामुळे हातगाडी, गाळ्यांमध्ये व्यवसाय करणारे व्यापारी प्लास्टिक वापर करण्यास पुढाकार घेत नव्हते. उपायुक्त कोकरे यांच्या बदली नंतर ही मोहीम पुन्हा थंडावली होती. आता आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी शहरातील कचरा, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर विषयावरुन आक्रमक भूमिका घेतल्याने घनकचरा विभागाने प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुध्द कारवाई सुरू केली आहे.
हेही वाचा : भाज्या कडाडल्या! ; पावसाच्या तडाख्याने पिकहानी : कोथिंबीर जुडी शंभरीपार
कारवाई पथक अचानक दुकानात जाऊन कारवाई करत असल्याने अनेक दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. मिठाई विक्रेते पालिकेच्या या कारवाई बद्दल नाराज आहेत. दुकानात ग्राहकांची गर्दी असताना कारवाई पथक दुकानात येते. कारवाई सुरू करते हे योग्य नाही. कोणीही दुकानदार प्लास्टिकचा वापर करत नाही. तरीही कारवाई केली जात असल्याने पालिकेने दुकानदारांना विहित आकार, वापराच्या पिशव्या पुरवाव्यात अशी दुकानदारांची मागणी आहे.