गणेशोत्सवाच्या अकरा दिवसाच्या कालावधीत रेवदंड्याचे नाना धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि कल्याण डोंबिवली पालिकेने यांनी १७५ टन निर्माल्य कल्याण, डोंबिवलीतील गणपती विसर्जन ठिकाणे, गणेश घाटावरुन जमा केले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करुन त्याचे खत करण्यात येणार आहे.कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत दीड दिवसांपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती विसर्जनासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने कृत्रिम तलाव, दुर्गाडी, डोंबिवली रेतीबंदर, कल्याण पूर्व, पश्चिम भागातील तलाव अशा सुमारे ६५ ठिकाणी गणपती विसर्जनाची व्यवस्था केली होती. जलप्रदूषण टाळण्यासाठी पालिकेने विसर्जन ठिकाणांच्या ठिकाणी निर्माल्य संकलन व्यवस्था केली होती. या संकलन केंद्राच्या माध्यमातून पालिकेने गणेशोत्सवाच्या काळात १७१ टन निर्माल्य जमा केले.
प्रतिष्ठान उपक्रम
सार्वजनिक स्वच्छता, जलप्रदूषण, पर्यावरण संवर्धन उपक्रमांमध्ये नेहमीच आघाडीवर असलेल्या नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी गणेशोत्सव काळात डोंबिवली, ठाणे शहराच्या विविध भागात गणपती विसर्जन दिवशी निर्माल्य संकल्प केंद्र सुरू केली होती. या संकलन केंद्रांवर धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सुमारे तेवीसशे सदस्य निर्माल्य संकलनाचे काम करत होते. या सदस्यांनी गणेशोत्सव काळात ठाणे येथील रायलादेवी भाग, डोंबिवलीतील विविध भागातून एकूण ११ हजार किलो निर्माल्य जमा केले. डोंबिवलीत आठ हजार ५०० किलो निर्माल्य जमा करण्याचे काम अकराशे सदस्यांनी केले. ठाण्यात अकराशे सदस्यांनी एकोणीसशे किलो निर्माल्य जमा केले.
निर्माल्य जमा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी ते एका मंडपात पसरवुन त्यामधील दोरे, कलाबुत, प्लास्टिक वस्तू बाजुला काढल्या. फुलांच्या पाकळ्या एका बाजुला काढून त्या खत निर्मिती प्रक्रियेसाठी तयार करुन ठेवल्या आहेत. तयार होणारे खत नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील अनेक महत्वाच्या रस्त्यांवर वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्या झाडांना वेळोवेळी हे खत देण्यात येईल. तसेच मागणीप्रमाणे या खताचे नागरिकांना वितरण केले जाईल, असे प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सांगितले.