डोंबिवली – डोंबिवली शहराचे ग्रामदैवत असलेल्या फडके रस्त्यावरील श्री गणेश मंदिराच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे वर्षभर मंदिराचा शताब्दी महोत्सव साजरा केला जाणार आहे. ८ मे २०२३ ते २६ मे २०२४ या वर्षभराच्या कालावधीत अनेक सामाजिक, धार्मिक, आरोग्य, माहिती मार्गदर्शनपर, सांस्कृतिक कार्यक्रम या कालावधीत होतील, अशी माहिती श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा व प्रवचनकार अलका मुतालिक यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणेश मंदिर विश्वस्त मंडळ, शताब्दी महोत्सव संयोजन समिती सदस्यांच्या नियोजनामधून वर्षभरातील कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. डोंबिवलीतील विविध क्षेत्र, जाती, धर्म, पंथातील मंडळींना एका व्यासपीठावर आणून हा महोत्सव साजरा केला जाणार आहे. बाल-गोपाळांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत, शाळकरी मुले, शिक्षक यांनाही या उपक्रमांत सहभागी करुन घेण्यात आले आहे, असे अध्यक्षा मुतालिक यांनी सांगितले.

हेही वाचा – कल्याण, डोंबिवलीत मुसळधार पावसाची हजेरी

समाजाच्या उन्नत्तीसाठी एकत्र येण्यासाठी गावात एक धार्मिक अधिष्ठान असावे या विचारातून डोंबिवलीत ९९ वर्षांपूर्वी गणेश मंदिराची उभारणी झाली. त्यानंतर मंदिराचा जिर्णोद्धा होत गेला. भेदाभेदी न ठेवता मंदिराचा कारभार झाला पाहिजे, या संस्थापकाच्या घटनेतूनच आजपर्यंत मंदिराचा कारभार सुरू आहे. मंदिराच्या माध्यमातून गरजूंना मदत, दुर्गम, दुष्काळी भागात अनेक समाजपयोगी, शेतकरी लाभाचे उपक्रम राबविण्यात आले आहेत, असे अध्यक्षा मुतालिक यांनी सांगितले.

शताब्दी महोत्सव पत्रकार परिषदेला शताब्दी महोत्सव संयोजन समिती प्रमुख वैद्य विनय वेलणकर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कीर्तनकार बाळकृष्णबुवा पाटील, डाॅ. विवेक महाजन, सनदी लेखापाल राजेंद्र मानुधने, ऋतुराज कुलकर्णी, मंदिर विश्वस्त राहुल दामले, मंदार हळबे, गौरी खुंटे, राजय कानिटकर, आनंद धोत्रे उपस्थित होते.

मंदिराचे नुतनीकरण

शताब्दी महोत्सानिमित्त मंदिराचे नुतनीकरण केले जाणार आहे. गणपतीचा देव्हारा चांदीचा केला जाणार आहे. टपाल विभागाकडून गणेश मंदिराचे टपाल तिकीट प्रकाशित केले जाणार आहे. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रस्त्यावरील भावे सभागृहाजवळ दोन हजार चौरस फुटाच्या जागेत वैद्यकीय सेवा केंद्र सुरू केले जाणार आहे. संस्थानतर्फे पॅथाॅलाॅजी लॅब सुरू करण्याचे नियोजन आहे. रास्त दरातील सोनोग्राफी केंद्र सुरू आहे. या उपक्रमांसाठी निधीची गरज लागणार आहे. शहरातील दात्यांच्या माध्यमातून निधी संकलन करुन ही कामे केली जाणार आहेत, असे विश्वस्त प्रवीण दुधे यांनी सांगितले.

३६५ दिवस पूजेचा मान

शताब्दी महोत्सवाच्या वर्षभरात डोंबिवली शहर परिसरातील इच्छुक नागरिकांना मंदिरातील गणपतीची पूजा करण्याचा मान दिला जाणार आहे. सकाळ, संध्याकाळच्या वेळेत ही सुविधा असणार आहे. आतापर्यंत १२५ भाविकांनी पूजेसाठी नोंदणी केली आहे. ज्या भाविकांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे. त्यांनी मंदिरात येऊन नोंदणी करावी, असे आवाहन संस्थानने केले आहे.

हेही वाचा – बारसू येथे आंदोलकांवर लाठीहल्ला का? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

वर्षभराचे उपक्रम

७ मे रोजी शतक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला सावळाराम महाराज क्रीडासंकुलात ८०० युवकांच्या सहभागातून महाढोल ताशा वादनाने शताब्दी महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. ८ मे रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता कीर्तनकार चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते शतक महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन होईल. त्यानंतर वर्षभराच्या कालावधीत गणेश याग, महारक्तदान शिबीर, वेदशास्त्री पळसकर यांचे निरुपण, निरुपणकार धनश्री लेले, भागवत सप्ताह, कीर्तन महोत्सव, नवरात्रोत्सव, गुरुचरित्र पारायण, रामोत्सव, पु. भा. भावे व्याख्यानमाला, सूर्यनमस्कार दिन, महिला दिन, हनुमान याग अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. २६ मे २०२४ रोजी शताब्दी महोत्सवाच्या समारोपाचे नियोजन करण्यात आले आहे.

“श्री गणेश मंदिर संस्थानच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. सर्व वयोगट, जाती धर्मातील मंडळींना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे.” असे गणेश मंदिर संस्थान अध्यक्ष अलका मुतालिक म्हणाल्या.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commencement of centenary celebrations of ganesha temple in dombivli ssb