ठाणे : ठाणे पुर्व रेल्वे स्थानकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सॅटीस पुलाची उभारणी करण्यात येत असून याच पुलाला जोडून पुर्व स्थानक परिसरात ११ मजली व्यावसायिक इमारत उभारण्यात येणार आहे. इमारतीच्या तळमजल्यावर वाहनतळ, एक मजला रेल्वे सुविधांसाठी तर, एक मजला बस वाहतुकीसाठी वापरला जाणार आहे तर, उर्वरित आठ मजल्यावर व्यापारी संकुल उभारून ते ६० वर्षांकरीता भाड्याने देण्यात येणार आहे. या कामासाठी रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने निविदा काढली आहे. यानुसार, ठाणे पुर्व सॅटीसवरील व्यापारी संकुल पुढील दिड वर्षात म्हणजेच ३० जूनपर्यंत खुले होणार असल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे.
हेही वाचा >>> दिवा रेल्वे पादचारी पुलावरील गर्दीचा ताण कमी होणार! ;मध्य रेल्वेकडून पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात
ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. पश्चिम स्थानक परिसरातील कोंडी कमी करण्यासाठी यापुर्वीच सॅटीस पुलाची उभारणी करण्यात आली आहे. अशाचप्रकारे पुर्व स्थानक परिसरात ठाणे महापालिका सॅटीस पुलाची उभारणी करीत आहे. या पुलाला जोडून पुर्व स्थानक परिसरात बस वाहतूकीसाठी डेक उभारण्यात येत आहे. या डेकसोबत ११ मजली इमारत उभारण्यात येणार आहे. येथे सुमारे ९ हजार चौरस मीटर जागेवर सुमारे २४ हजार २८० चौरसमीटर इतके बांधीव क्षेत्र उभारले जाणार आहे. ठाणे पुर्व रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला प्लॅटफॉर्म क्रमांक १० ए जवळ ही व्यावसायिक इमारत उभारली जाणार आहे. यातील इमारतीच्या तळमजल्यावर वाहनतळ, एक मजला रेल्वे सुविधांसाठी तर, एक मजला बस वाहतुकीच्या डेकसाठी वापरला जाणार आहे तर, उर्वरित आठ मजल्यावर व्यापारी संकुल उभे केले जाणार आहे. डेकच्या वरच्या पहिल्या मजल्यावरील जागा दुकानांसाठी वापरली जाईल आणि त्यावरील इतर मजल्यांची जागा कोणत्याही व्यावसायिक हेतूसाठी असेल. यामुळे ही इमारत व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखली जाईल. ही जागा रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने ६० वर्षांच्या कालावधीसाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा काढल्या आहेत. यामध्ये ३० जून २०२६ पर्यंत भाडेपट्ट्याने जागा हस्तांतरित करण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.
हेही वाचा >>> कल्याणला एक्सप्रेसमध्ये रात्री गर्दीचा गैरफायदा घेत महिलेचा विनयभंग
रस्ते जोडणी ठाणे पुर्व रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला प्लॅटफॉर्म क्रमांक १० ए जवळ व्यावसायिक इमारत उभारली जाणार आहे. या इमारतीच्या डेकला जोडूनच ठाणे महापालिकेने २.२४ किमीची एक वर्तुळाकार उन्नत मार्गिका तयार केली आहे. ही मार्गिका पूर्व द्रुतगती मार्गाला जोडण्यात आली आहे. या मार्गिकेमुळे पूर्व द्रुतगती मार्ग आणि ठाणे पुर्व रेल्वे स्थानक एकमेकांना जोडण्यात आले आहे. याशिवाय, हा मार्ग प्रस्तावित मेट्रोला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे येथील इमारत व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखली जाईल, असा दावा प्राधिकरणाच्या सुत्रांनी केला आहे.