माध्यमांमध्ये सध्या होऊ घातलेले व्यावसायीकीकरण पत्रकारितेला धोक्याचे असून, आदर्शवादापासून सध्याची माध्यमे दूर चालल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार व लोकसत्ताचे माजी संपादक अरुण टिकेकर यांनी व्यक्त केले. आदर्श महाविद्यालय येथे आयोजित केलेल्या ‘भारतीय वृत्तपत्रांची भूमिका – वसाहतिक ते समकालीन कालखंड’ या दोन दिवसीय वृत्तपत्रविषयक राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैदेही दप्तरदार व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
टिकेकर म्हणाले की, भारतीय वृत्तपत्रे ही स्वातंत्र्योत्तर व स्वातंत्र्यपूर्व अशा दोन कालखंडात विभागली असून स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्य मिळवण्याच्या हेतूने संपादक मंडळी प्रेरित होऊन काम करत होती. मात्र स्वातंत्र्यानंतर उद्दिष्ट नष्ट झाल्याने पत्रकारितेला हळूहळू व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले.
हे व्यावसायीकीकरण माध्यमांसाठी घातक आहे. माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या मुद्दयावरून लोकशाही मार्गाने निवडून आलेली नेतेमंडळी त्यांच्यावर हरकती घेऊ लागली. त्यावर उपाय म्हणून या बडय़ा राजकीय नेत्यांनी स्वतची वृत्तपत्रे सुरू केली. तिथेच पत्रकारितेच्या हक्कांची गळचेपी होऊ लागली. त्यामुळे व्यवसायिकीकरण झालेल्या माध्यमांमध्ये स्पर्धा सुरू होऊन त्यांच्याकडे उत्पादन म्हणून पाहण्यात येऊ लागले. इलेकट्रॉनिक माध्यमे या स्पर्धेपायी स्वतची मर्यादा ओलांडत आहेत, असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा