बदलापूर : गुरुवारी बदलापूर पश्चिम येथील एका शाळेत १४ वर्षाच्या मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना घडली. शिक्षकानेच हा विनयभंग केल्याने त्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी शुक्रवारी शाळेला भेट दिली. या भेटी वेळी ही शाळाच अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शाळेला फक्त इयत्ता पहिली पर्यंत परवानगी होती. मात्र सध्या दहावीपर्यंतचे विद्यार्थी या शाळेत शिकत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बदलापुरात शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर पश्चिमेच्या एका खाजगी शाळेत एका १४ वर्षीय मुलीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याची तक्रार गुरुवारी दाखल करण्यात आली. हा शिक्षक संबंधित विद्यार्थिनीला वारंवार मानसिक त्रास देत होता. असभ्य आणि अश्लील टिपणी करून विद्यार्थिनीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वागत होता. गुरुवारी या शिक्षकाने चुकीचा स्पर्श करत सर्व मर्यादा ओलांडल्या. अखेर मुलीने या संदर्भात पालकांकडे तक्रार केली. पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर संबंधित शिक्षकाला अटक करून त्याच्यावर पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे बदलापूर आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यातच संताप व्यक्त होतो आहे. याची दखल राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांनीही घेतली.

शुक्रवारी राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य नीलिमा चव्हाण यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे आणि संबंधित शाळेत भेट देऊन माहिती घेतली. यावेळी शाळेत केलेल्या तपासणीत शाळेचे वर्ग अनधिकृत असल्याची बाब समोर आली आहे. या शाळेला फक्त इयत्ता पहिलीपर्यंत परवानगी होती. मात्र शाळेत सध्याच्या घडीला दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरत आहेत. त्यामुळे शाळेचे पितळ उघडे पडले आहे. शाळेच्या वर्गांना परवानगी नसतानाही वर्ग कसे भरवले जात आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. स्थानिक पालिका प्रशासन, तालुका शिक्षण विभाग यांच्या कारभारावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आहे.

प्रतिक्रिया: बालहक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आज शाळेला भेट दिली असता प्राथमिक अहवालात शाळेला पहिलीपर्यंत मान्यता असल्याचे दिसून आले आहे. याबाबत गटशिक्षण अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शिक्षण विभाग पुढील कारवाई करत आहे. – नीलिमा चव्हाण, सदस्य, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग.