ठाणे शहरात पहिल्या टप्प्यात आनंदनगर ते माजिवडा पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सौंदर्यीकरणाचे काम करण्यात यावे आणि त्याचे प्रतिबिंब सगळीकडे उमटलेले हवे, असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी या कामाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान दिले. कोणतेही काम उत्तम दर्जाचेच झाले पाहिजे. त्यात कुठेही तडजोड नको, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी यावेळी दिला आहे. त्याचबरोबर ठाण्याच्या प्रवेशद्वारापाशी खडबडीत झालेला रस्ता तातडीने दुरुस्त करावा आणि दिशादर्शक फलकांची पुरेशी व सहज दिसतील अशी मांडणी केली जावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
हेही वाचा >>>डोंबिवली : ठाकुर्ली उड्डाण पुलाला नगररचना विभागाचा अडथळा?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे शहरात सौंदर्यीकरणाच्या कामास सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आनंदनगर ते माजिवडा पर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा काम सुरू झाले असून या कामाची बुधवारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. या दौऱ्याला नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, कार्यकारी अभियंता विकास ढोले आणि इतर अधिकारी उपस्थित होते. शहराच्या प्रवेशद्वारापाशी उभारण्यात येत असलेल्या २५ मीटर उंचीच्या दीपस्तंभाच्या कामाचाही आढावा त्यांनी घेतला. शहरातील भिंतीवरची काही चित्रे जुनी झाली आहेत. त्याचे पुन्हा रंग काम करावे लागेल, चित्रे खराब झाली असतील तर ती पूर्ण नव्याने करायला हवीत. त्यातून, सुशोभीकरणात सातत्य राहील, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, थ्री डी चित्रांचे प्रमाण मोजेकच पण ठळकपणे दिसणारे असेल. चित्र थ्री डी असो किंवा टू डी त्यात सुबकता, रंगाचा दर्जा आणि सोंदर्यदृष्टी याबाबत दक्ष राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>बेशुद्ध करण्याचे औषध फवारून लूट ; अंबरनाथच्या मोहनपुरम भागातील घटना, दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण
शहरातील उड्डाणपुलाखाली असलेली उद्याने, सेवा रस्त्यालगत नव्याने विकसित केलेली उद्याने दररोज स्वच्छ झाली पाहिजेत. ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी लावलेले डबे वेळच्यावेळी रिकामे झाले पाहिजेत. या सगळ्याची जबाबदारी स्थानिक स्वच्छता निरीक्षकांवर राहील, त्यात कोणतीही हयगय नको, असा इशाराही त्यांनी दिला आहे. माजिवडा नाका येथील रंग, चित्रे यांची संकल्पना लवकर ठरवून ते काम ठरलेल्या वेळेत करावे. उपयोगात नसलेले जाहिरातींचे स्टँड, जुन्या चौक्या हटवा, त्या पूर्ण परिसराला चांगले रूप कसे मिळेल, याबद्दल अधिकारी आणि कंत्राटदार यांनी विचारपूर्वक कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. आनंदनगर ते माजिवडा पर्यंतच्या कामांचा परिणाम येत्या १५ दिवसात दिसावा या दृष्टीने काम पूर्ण करण्याची तयारी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>कल्याण: “मनसे बरोबर युती म्हणजे…” महापालिका निवडणुकांच्या तोंडावर रामदास आठवले म्हणाले…
या पाहणी दरम्यान, आयुक्त बांगर यांना ठिकठिकाणी राडारोडा, मातीचे ढिगारे पडलेले तसेच, सर्व पुलांवर माती साठून त्या धुळीचा त्रास होत असल्याचेही निदर्शनास आले. त्यावर, त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करून पुलांवरील माती हटवली जाईल अशी व्यवस्था करण्यास नौपाडा आणि माजिवडा येथील उपायुक्तांना सांगितले. तसेच, सगळीकडे पडलेले डेब्रिज तातडीने हटविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे काम मोहीम म्हणून हाती घेतले तरच सुशोभीकरणाच्या कामाला खऱ्या अर्थाने झळाळी प्राप्त होईल. त्याचा परिणाम जाणवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सिग्नल आणि कॅमेरे
तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन आणि माजीवडा जंक्शन ही वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची जंक्शन आहेत. नागरिक आणि वाहन यांची वर्दळ मोठी असते. त्यामुळे सोंदर्यीकरणाच्या कामात या जंक्शनला प्राधान्य देण्यात आले यावे. येथील चौकामध्ये लावण्यात आलेल्या सिग्नल आणि कॅमेऱ्याच्या खांबांमुळे त्या चौकाच्या सौंदर्यास बाधा येत असल्याचे निरीक्षण आयुक्त बांगर यांनी नोंदविले. हे सिग्नल आणि कॅमेरे पुलालाच योग्य पद्धतीने लावता येतील का हे पाहण्याच्या सूचना त्यांनी उपनगर अभियंता (विद्युत) शुभांगी केसवानी यांना दिल्या. तीन हात नाका येथील निवास करून राहणारे भिकारी, पकडून आणलेल्या गाड्या हटविण्याच्या सूचनाही त्यांनी वाहतूक पोलिसांना दिल्या.
शहर सौंदर्यीकरणाच्या कामामध्ये सर्वाधिक वर्दळीच्या भागाला प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेचे सौंदर्यीकरण प्राधान्याने होत आहे. टप्प्याटप्प्याने शहरभरात सगळीकडे हा कार्यक्रम राबविला जाईल.– अभिजीत बांगर,आयुक्त, ठाणे महापालिका, ठाणे.