ठाणे : भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला शिस्त लावण्याचे प्रयत्न आयुक्त अनमोल सागर यांनी सुरू केले असून त्यापाठोपाठ आता त्यांनी नागरी सुविधांसाठी सामायिक क्युआर कोडची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. यामुळे पालिकेच्या कर भरणा करणे, सेवा हमी कायद्यानुसार एखाद्या सेवेकरिता अर्ज करणे, तक्रार करणे आणि प्रलंबित तक्रारींचा आढावा घेणे, अशा सुविधा नागरिकांना घरबसल्या उपलब्ध होणार आहे.
अशी सुविधा देणारी ही राज्यातील पहिली महापालिका असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. भिवंडी निजामपूर शहर महापालिकेचा २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. हा अर्थसंकल्प सादर करताना आयुक्त अनमोल सागर यांनी पारदर्शक आणि गतीमान प्रशासन राबविण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्याची पुर्तता करण्यासाठी आयुक्त सागर यांनी पाऊले टाकण्यास सुरूवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सामायीक क्युआर कोड सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत ‘सुकर जीवनमान’ उपक्रमाद्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या क्युआर कोडचे स्टिकर महापालिकेच्या सर्वच कार्यालयाबाहेर चिकटवण्यात येणार आहेत.
क्युआर कोडद्वारे कोणत्या सुविधा मिळणार
भिवंडी निजामपूर शहर महापालिकेने तयार केलेल्या क्युआर कोडद्वारे नागरीकांना घरबसल्या कर भरणा करता येणार आहे. तसेच शासनाने अधिसूचीत केलेल्या ७० सेवांसाठी अर्ज करणे, तक्रार निवारण होत नसल्यास घरबसल्या तक्रार करणे तसेच केलेली तक्रार कोणत्या कार्यालयात प्रलंबित आहे याचा आढावा घेणे, अशी सुविधा क्युआर कोडद्वारे उपलब्ध होणार आहे. एखाद्या सेवेबद्दल तक्रार करायची असेल तर नागरिकांना क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर त्यावर एकदाच नोंदणी करावी लागणार आहे. यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, अशी माहिती पालिकेचे माहिती व जनसंपर्क अधिकारी श्रीकांत परदेशी यांनी दिली. नागरिकांनी क्युआर कोड सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आयुक्त सागर यांनी केले आहे.
तर अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याने सात दिवसांत तक्रार निकाली काढली नाही तर, ही तक्रार आज्ञाप्रणालीमार्फत वरिष्ठ अधिकाऱ्याकडे वर्ग होणार आहे. त्याचा आढावा आयुक्त सागर हे स्वत: प्रत्येक आठवड्याला आढावा घेणार आहेत. तसेच ज्या अधिकाऱ्याकडे एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी तक्रार प्रलंबित असेल तर, त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशारा आयुक्त सागर यांनी दिला आहे.