कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेतील अनुकंपा तत्वावरील मागील १५ वर्षाच्या काळातील ८८ कामगारांची अनुकंपा तत्वावरील प्रकरणे मार्गी लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी घेतला आहे. अनेक वर्ष नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनुकंपा तत्वावरील कामगारांनी या निर्णयामुळे समाधान व्यक्त केले आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या सेवेत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासन आदेश, महाराष्ट्र प्रांतिक कलमाचा आधार घेऊन पालिकेत वारसाच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे अनुकंपा तत्वावर नियुक्ती केली जाते. सन २०१० ते २०२४ या १५ वर्षाच्या कालावधीत पालिकेच्या विविध विभागातील ८८ कामगार विविध प्रकारचे आजार, व्याधींनी मरण पावले. या मयत कर्मचारी, कामगारांच्या वारसांनी पालिकेत आपल्या नातेवाईकाच्या जागी नोकरी मिळविण्यासाठी पालिकेत अर्ज केले होते. या अर्ज प्राप्तीनंतर अर्जदाराचे नातेवाईकाशी असलेले नाते, अर्जदाराने पालिकेत सादर केलेली नातेसंबंधाची कागदपत्रे आणि इतर आवश्यक पडताळणी करण्याची प्रक्रिया पालिकेत पार पाडली जाते.

हेही वाचा…ठाण्यात बांगलादेशींचे तळ ? वर्षभरात ६७ बांगलादेशी अटक

या कागदपत्रांच्या छाननी नंतर मयत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वारसाला पालिकेत नोकरी दिली जाते. यापूर्वी ही प्रकरणे वर्षानुवर्ष रेंगाळत असत. प्रशासनाकडून त्यांचा विचार केला जात नव्हता. त्यामुळे नियुक्तीच्या प्रतीक्षेतील कामगारांना नैराश्य येत होते. पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी सामान्य प्रशासनाला विभागाला पालिका सेवेतील मयत कामगारांच्या वारसांची पालिका सेवेतील अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची प्रकरणे मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. सामान्य प्रशासन अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त वंदना गुळवे, अधीक्षक यांनी सन २०१० ते सन २०२४ पर्यंतची अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची सर्व प्रकरणे तपासली. या तपासणीत पालिका सेवेतील मयत कामगारांचे ८८ वारस नियुक्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे स्पष्ट झाले. या वारस कामगारांची प्रारूप यादी तयार करण्यात आली. या सर्व पात्र वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय आयुक्त डाॅ. जाखड यांच्या मान्यतेने अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त वंदना गुळवे यांनी घेतला.

अनेक वर्षानंतर ही प्रकरणे मार्गी लागत असल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी आयुक्त पदाच्या कालावधीत कर्मचाऱ्यांची मागील अनेक वर्षाची प्रकरणे मार्गी लावल्याने अधिकारी, कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

हेही वाचा…तानसा अभयारण्यात पक्षी गणना, ७५ पक्ष्यांची नोंद

उच्चशिक्षित कामगार

अनुकंपा तत्वावर नियक्तु होणारे काही कामगार इंजिनिअर, पदवीधर, दहावी, बारावी, एमएच-सीआयटी शिक्षण घेतलेले आहेत. नियुक्त बहुतांशी कामगार हे सफाई कामगारांचे वारस आहेत. आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे मागील अनेक वर्षाची अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची प्रकरणे मार्गी लावली आहेत. अशाच पध्दतीने वारसा हक्काची प्रकरणे लवकरच मार्गी लावली जातील. अनुकंपा तत्वावरील नियुक्त पात्र कर्मचाऱ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. हर्षल गायकवाड अतिरिक्त आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग.

Story img Loader