कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका परिसरात एकत्रित परिवहन प्राधिकरण मंंडळाच्या माध्यमातून बस सेवा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी मंगळवारी कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर माध्यमांना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केडीएमटी उपक्रमाचा ३१५ कोटी जमेचा आणि दोन कोटी ८२ लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला. यावेळी कल्याण-डोंबिवली पालिका, अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका, उल्हासनगर, भिवंडी महापालिकांचे एकत्रित परिवहन प्राधिकरण मंडळ स्थापन करण्यात आले आहे. हे मंडळ स्थापन करण्याला संबंंधित महापालिकांनी अनुमती दिली आहे. या परिवहन मंडळाच्या माध्यमातून भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ परिसरातील प्रवाशांना एकत्रित बस सेवा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. एकत्रित परिवहन प्राधिकरण मंडळाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. हा प्रस्ताव मंजुरीनंतर एकत्रित बससेवेचा मार्ग उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आयुक्त डाॅ. जाखड यांनी दिली.

हेही वाचा >>>वाहन चालकाची दादागिरी… अन् महामार्गावर तीन तास कोंडी

या बससेवेमुळे डोंबिवली येथे बसमध्ये बसलेल्या प्रवाशाला एकाच बसमधून कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ येथे किफायतशीर भाडेदरात प्रवास करणे शक्य होणार आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य मिळून वाहन कोंडीचा प्रश्न मार्गी लावणे शक्य होणार आहे. इंधन बचत, बस वाहतुकीचे नियंत्रण करणे परिवहन मंडळाला शक्य होईल, असे आयुक्तांनी सांगितले.

मागील दीड वर्षापूर्वी केडीएमटी प्रशासनाने परिवहन मंडळाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजूर होत नसल्याने परिवहन अधिकारी, प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commissioner dr indurani jakhar informed that a combined bus service is being considered for passengers in kalyan area amy