कल्याण – कल्याण, डोंबिवली शहरे वाहतूककोंडी मुक्त करण्यासाठी प्रभावी उपाय योजना करा. तसेच, रेल्वे स्थानक परिसर पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळे असावेत या दृष्टीने नियोजन करा, अशा सूचना कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी उच्चपदस्थ वाहतूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना नुकत्याच झालेल्या बैठकीत केल्या आहेत. वाहतूककोंडी मुक्त उपाय योजनांसाठी पोलिसांना पालिका प्रशासन पूर्ण सहकार्य करील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील वाहतूक कोंडी, रेल्वे स्थानक परिसरातील वाढती गर्दी आणि त्या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करून तेथील रस्ते नागरिकांना केवळ चालण्यासाठी उपलब्ध झाले पाहिजेत. रेल्वे स्थानक परिसर कोंडी मुक्त असला पाहिजे, या उद्देशातून आयुक्त डाॅ. जाखड यांंनी वाहतूक पोलिसांसोबत बैठक घेतली. या बैठकीला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड, रेल्वे, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शहरातील दर्शक यंत्रणा, वाहनतळ सुविधा, मोकळे पदपथ, रस्ते या विषयांंवर चर्चा झाली. कल्याण, डोंंबिवली या वर्दळीच्या रेल्वे स्थानक भागात दररोज वाहनांची गर्दी असते. या गर्दीतून वाट काढणे प्रवाशांना अवघड होते. रेल्वे स्थानक परिसर ही वर्दळीची ठिकाणे आहेत.
हेही वाचा >>>कल्याण-डोंबिवलीतील ४९१ रस्ते बाधितांना झोपु योजनेत घरे मिळण्याचा मार्ग मोकळा
या भागातील रस्ते मोकळे असले पाहिजेत. रेल्वे स्थानक भागातील रिक्षा वाहनतळ निश्चित करण्यासाठी पालिका, आरटीओ, रेल्वे, वाहतूक, पोलिसांचे एक संयुक्त पथक तयार करून उपाय योजना करण्याची सूचना आयुक्तांनी केली. शहरातील दर्शक यंत्रणा सुरळीत चालेल. कोंडी मुक्त रस्ते राहण्यासाठी दर्शक यंत्रणेचे चौकांप्रमाणे वेगळे टप्पे ठेवण्यात यावेत, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. रेल्वे स्थानक भागात पालिकेच्या जागांवर शुल्क द्या, वाहने उभी करा, अशी योजना सुरू केली तर त्याला प्रवाशांचा चांंगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास उपायुक्त डाॅ. राठोड यांनी व्यक्त केली. वाहतूक पोलिसांनी अशी ठिकाणे निश्चित केली तर नक्की त्याचा विचार पालिका करील. या उपक्रमाला सर्वोतपरी सहकार्य पालिका प्रशासन करील, असा विश्वास आयुक्त जाखड यांंनी व्यक्त केला.