मागील चार वर्षांपासून कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सीमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे अठरा महिन्यांच्या अवधीत पूर्ण होणे आवश्यक असताना, त्यांना दोन ते तीन वर्षे विलंब का लागला, असा सवाल उपस्थित करत नवे आयुक्त मधुकर अर्दड यांनी अभियंत्यांची खरडपट्टी काढली आहे. सीमेंट रस्त्यांची कल्याण, डोंबिवलीतील कामे वेगाने पूर्ण करा. माझ्या कारकीर्दीत कामे वेगाने पुढे जात असल्याचे दिसले पाहिजे. सीमेंट रस्त्यांची कामे सुरू असल्याच्या ठिकाणी सतत महापालिकेचा अभियंता उपस्थित पाहिजे, अशा शब्दात आयुक्तांनी प्रकल्प अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्यासह अन्य अभियंत्यांना सुनावले.
सीमेंट रस्त्यांची कामे रखडल्याने शहरात बेसुमार वाहतूक कोंडी, धुळीचे लोट, आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर अर्दड यांनी अभियंत्यांची दालनात बैठक घेतली.
सीमेंट रस्त्यांची कामे सुरू असल्याच्या ठिकाणी कार्यालयीन वेळेत चार उपअभियंते मला दिसले पाहिजेत. यामध्ये तडजोड केली जाणार नाही. ही कामे निकृष्ट झाल्याच्या तक्रारी वाढेपर्यंत महापालिकेचा दक्षता गुणनियंत्रण विभाग काय करीत होता, असा प्रश्न या विभागाचे प्रमुख चंद्रकांत कोलते यांना केला. तुम्ही आतापर्यंत किती गुणनियंत्रणाचे अहवाल दिले, त्यावर काय कारवाई झाली, असा प्रश्नांचा भडिमार यावेळी आयुक्तांनी केला.  यावेळी कोलते निरुत्तर झाले. एवढय़ा अभियंत्यांची प्रत्यक्ष कामावर नेमणूक करणे शक्य होणार नाही. कारण प्लॅन्टवर तीन उपअभियंते लागतात, असे प्रकल्प अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी सांगितले. त्यावरही नव्या आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.

‘नागरिकांना त्रास नको’
प्रकल्प विभागाचा आवाका खूप आहे. त्यामुळे आपल्याकडील थोडा भार कमी करा, असे कुलकर्णी यांनी बैठकीत सांगताच उपस्थित अभियंत्यांच्या भुवया उंचावल्या. नागरिकांना त्रास होईल, असे काही न करता सीमेंट रस्त्यांची कामे पूर्ण करा. आपल्या काळात प्रत्येक कामात बदल दिसला पाहिजे, असे मधुकर अर्दड यांनी अभियंत्यांना सांगितले.

Story img Loader