कल्याण- डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागात मुख्य वर्दळीच्या रस्त्याला बाधित ठरणारी, वाहतुकीला अडथळा ठरणारी काळुबाई मांढरादेवी मंदिरा जवळची सात माळ्याची बेकायदा इमारत जमीनदोस्त करा, असे आदेश आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी ह प्रभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर ही इमारत भुईसपाट केली जाईल, असे ह प्रभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. देवीचापाडा येथील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर काळुबाई मांढरादेवी मंदिरा जवळ आणि कबु छाया, देवकी निवास इमारतींजवळ दोन भूमाफियांनी गेल्या वर्षापासून पालिकेच्या परवानग्या न घेता संथगतीने एका बेकायदा इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे. ह प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्या कालावधीत हे बांधकाम सुरू झाले होते. या बांधकामाला रोकडे यांनी नोटिसा दिल्या होत्या. वेळकाढूपणा करुन इमारत तोडण्याची कारवाई केली नव्हती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोकडे यांच्या बदलीनंतर भूमाफियांनी पुन्हा दिवस, रात्र काम करुन या बेकायदा इमारतीचे सात माळे बांधून पूर्ण केले. या बेकायदा इमारती विषयी परिसरातील नागरिकांनी अनेक तक्रारी आयुक्तांकडे केल्या आहेत. मुकेश म्हात्रे, जितू म्हात्रे या भूमाफियांनी ही बेकायदा इमारत उभारणीचे काम केले आहे, असे पालिका मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. आताचे साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनीही मुकेश म्हात्रे, जितू म्हात्रे या भूमाफियांना काम थांबविण्याच्या यापूर्वीच सूचना केल्या आहेत.

हेही वाचा >>>ठाणे: वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नाने हरविलेला एक लाख रुपयांचा कॅमेरा विद्यार्थ्याला मिळाला परत

ही बेकायदा इमारत उभी राहिलेला रस्ता १५ मीटरचा आहे. मुकेश, जितू यांनी उभारलेली बेकायदा इमारत विकास आराखड्यातील रस्त्याला अडथळा येणार आहे. या रस्त्यावरुन येत्या काळात माणकोली पुलाकडून येणारी वाहने, टिटवाळाकडून येणाऱ्या बाह्य वळण रस्त्याकडे जाणारी वाहने येजा करणार आहेत. या वाहनांना रस्त्याला बाधित उभारलेली ही बेकायदा इमारत अडथळा ठरणार आहे. भविष्यात सत्यवान चौक ते रेतीबंदर चौक रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्यावेळी ही मुकेश, जितू या भूमाफियांची इमारत रस्तारुंदीकरणात मोठा अडथळा ठरणार आहे. या इमारतीमध्ये २७ कुटुंब राहणार आहेत. त्यांची वाहने ठेवण्यासाठी इमारतीखाली वाहनतळ नाही. ती वाहने रस्त्यावर उभी केली जातील. या इमारतीला बेकायदा पाणी पुरवठा होईल. परिसरातील पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होईल. ही इमारत भुईसपाट करण्याचे आदेश आयुक्तांनी ह प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हेही वाचा >>>कल्याण रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाशी गैरवर्तन करणारा गर्दुल्ला पोलिसांच्या ताब्यात

ही इमारत पालिकेने जमीनदोस्त केली नाही तर आपण यासंदर्भात मंत्रालयात नगरविकास विभागाकडे तक्रार करणार आहोत, असे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पुसाळकर यांनी सांगितले.मुकेश म्हात्रे, जितू म्हात्रे यांची इमारत १५ मीटर रस्त्याला बाधित होत आहे. या इमारतीमुळे येत्या काळात वाहतुकीला अडथळा होण्याची धोका असल्याने ही इमारत जमीनदोस्त केली जाणार आहे, असे एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commissioner order to ward officials regarding demolition of illegal building at devichapada in dombivli amy