कल्याण: कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांनी गजबजलेले रस्ते, अस्वच्छता, खड्डे यामुळे सतत टीकेचे लक्ष्य होत असलेल्या प्रशासना वरील टीकेचा भार हलका करण्यासाठी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर रात्री नऊ वाजल्यानंतर शहराच्या विविध भागात भ्रमंती सुरू केली आहे. या भ्रमंतीमुळे सुशेगात असलेल्या अधिकारी, फेरीवाला हटाव कर्मचाऱ्यांची मात्र झोप उडाली आहे.

हेही वाचा >>> रस्त्यावरची ‘राजकीय’ फटाके दुकाने, कमानींमुळे डोंबिवली-कल्याणचा श्वास कोंडला

मंगळवारी रात्री आयुक्त डाॅ. दांगडे यांनी उपायुक्त अतुल पाटील, सचिव संजय जाधव यांच्या समवेत कल्याण, डोंबिवलीतील रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे सुरू आहेत की नाहीत. रात्रीच्या वेळेत कचरा उचलला जातो की नाही. फेरीवाल्यांनी रेल्वे स्थानक आणि विविध भागातून आपले बस्तान हलविले आहे की नाही हे पाहण्यासाठी अचानक पाहणी दौरा सुरू केला. ही कुणकुण लागताच प्रभागातील साहाय्यक आयुक्त आपली झाडाझडती नको म्हणून रात्रीच प्रभागात तैनात होते. प्रभागात एकही फेरीवाला बसणार नाही याची काळजी घेत होते.

हेही वाचा >>> नागरिक आकलन सर्वेक्षणात प्रभाग समित्यांची भूमिका महत्त्वाची; संदीप माळवी

कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक भागात कचरा दिसताच आयुक्तांनी संबंधित प्रभाग साहाय्यक आयुक्तांना फैलावर घेऊन यापुढे असा कचरा दिसता कामा नये. या कामात हलगर्जीपणा सहन न करता निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी तंबी दिली. कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील १५० मीटरच्या पट्ट्यात एकही फेरीवाला बसता कामा नये, हातगाडी जागीच तोडा, असे आयुक्तांचे साहाय्यक आयुक्तांना आदेश आहेत. प्रभागातील कचरा, फेरीवाले हे विषय आता साहाय्यक आयुक्तांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत. आतापर्यंत साहाय्यक आयुक्त फेरीवाला हटविण्याची जबाबदारी पथक प्रमुखाची बोलून आपली जबाबदारी झटकत होते. ही जबाबदारी आता साहाय्यक आयुक्तांवर आल्यापासून हे अधिकारी तणावाखाली आहेत.

हेही वाचा >>> मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाचा ठाकरे गटाला धक्का, ठाण्यात शिंदे गटाचीच ‘दिवाळी पहाट’ होणार

डोंबिवलीत फेरीवाले

कल्याणचा दौरा आटोपुन मंगळवारी रात्री रात्री साडे अकरा वाजता आयुक्त दांगडे डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात आले. फेरीवाल्यांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फडके रोड, बाजीप्रभू चौक, नेहरु रस्ता भागात एकही फेरीवाला नव्हता. फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे, मिलिंद गायकवाड आणि इतर कामगार प्रभागात एकही फेरीवाला बसणार नाही यासाठी तीन पाळ्यांमध्ये काम करत आहेत. ग प्रभाग हद्दीतील रामनगर रेल्वे तिकीट खिडकीजवळ १५ फेरीवाले आरामात व्यवसाय करत बसले होते.एवढ्या रात्री फेरीवाले रस्त्यावर रेल्वे स्थानक भागात व्यवसाय करत असल्याचे पाहून आयुक्तांचा संताप झाला. त्यांनी फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त वाघचौरे यांना हे फेरीवाले येथे का बसले. ते हटविले का नाहीत असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. हा प्रभाग आमचा नाही असे सांगुनही हद्दीचा वाद उपस्थित न करता फेरीवाल्यांवर साहाय्यकआयुक्तांनी कारवाई केली पाहिजे, असे परत आढळून आले तर निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा आयुक्तांनी दिला.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणात ‘ईडी’ची उडी; ‘कडोंमपा’ आयुक्तांकडून बोगस कागदपत्र मागवली

दिवाळी सणाच्या काळात फेरीवाले, विक्रेत्यांनी व्यवसाय करण्यासाठी दरवर्षी पालिकेकडून मुभा दिली जाते. यावेळी आयुक्तांनी अशी कोणतीही मुभा दिली जाणार नाही. रेल्वे स्थानक भागातील रस्ते नागरिकांना चालण्यासाठी मोकळे असले पाहिजेत, असे सांगून साहाय्यक आयुक्तांना निरुत्तर केले आहे. बहुतांशी फेरीवाले राजकीय मंडळीकडून व्याज घेऊन व्यवसाय करणारे असल्याने या कारवाईमुळे राजकीय मंडळींची सर्वाधिक कोंडी झाली आहे. आयुक्तांच्या आक्रमक भूमिकेची कर्मचाऱ्यांनी धास्ती घेतली आहे.

Story img Loader