लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : भिवंडी महापालिकेने अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांना ८११ कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून दिलेले असतानाही फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पालिकेच्या तिजोरीत जेमतेम ६४ कोटी ४७ लाख रुपयांचा कर जमा झाला आहे. कर वसुलीचे उद्दीष्ट आणि त्यात अत्यंत कमी प्रमाणात झालेल्या कर वसुलीच्या मुद्द्यावरून पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी आढावा बैठकीत नाराजी व्यक्त करत कर वसुलीवर भर देण्याचे आदेश दिले आहेत.

भिवंडी महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक अनमोल सागर यांनी पालिकेचा कारभार हाती घेतला असून त्याचबरोबर त्यांनी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्याबरोबरच कर वसुलीवर भर देण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतीच बैठक घेऊन त्यात मालमत्ता कर, पाणी देयक यासह इतर कर वसुलीचा आढावा घेतला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त देविदास पवार, उपायुक्त (कर) बाळकृष्ण क्षीरसागर तसेच प्रभाग समिती क्रमांक १ ते ५ मधील सर्व करवसुली अधिकारी उपस्थित होते.

भिवंडी महापालिकेने २०२४-२५ या वर्षांच्या अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांना कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून दिले होते. यामध्ये मालमत्ता कर, विशेष शिक्षण कर, वृक्ष कर, जल नि:सारण कर, विशेष स्वच्छता कर, जल लाभ कर, मल लाभ कर, अग्निशमन कर, शास्ती, व्याज, नोटीस शुल्क, वाॅरंट शुल्क, इतर, नवीन पाणीपट्टी वाढ, शिक्षण कर, रोजगार हमी कर, या सर्वातून ८११ कोटी १९ लाखांच्या कर वसुलीचे उद्दीष्ट पालिकेने ठरवून दिलेले आहे. परंतु २१ फेब्रुवारीपर्यंत पालिकेच्या तिजोरीत विविध कर वसुलीतून ६४ कोटी ४७ लाख रुपयांचा महसुल मिळाला आहे. प्रत्यक्षात कर वसुलीचे उद्दीष्ट आणि त्या तुलनेत कर वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी दिसून येत असून याच मुद्द्यावरून आयुक्त अनमोल सागर य़ांनी नाराजी व्यक्त केली. तसेच कर वसुली वाढवण्यासाठी स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करणे, नळ जोडणी खंडीत करणे, अशी कारवाई अधिकाअधिक तीव्र कारवाई करण्याचे आदेश त्यांनी सर्व संबंधित अधिकारी, लिपिकांना दिले.

भिवंडी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर वसुलीचा लेखाजोखा बैठकीत मांडला. यानुसार उत्पन्न वसुलीचे उद्दीष्ट ८११ कोटी १९ लाख इतके असून त्यापैकी ६४ कोटी ४७ लाख इतकीच वसुली झाली आहे. तसेच १ ते १५ फेब्रुवारीदरम्यान लागू केलेल्या अभय योजनेमुळे २१ कोटी रुपयांची कर वसुली झाली असून पालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात जास्त वसुली झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी बैठकीत केला.