ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १८ रुग्ण मृत्यु प्रकरणाची राज्य सरकारने नेमलेल्या समितीने गुरूवारपासून चौकशी सुरू केली आहे. या रुग्णांना रुग्णालयात केव्हा दाखल करण्यात आले, त्यावेळी त्यांची परिस्थिती कशी होती आणि त्यांच्यावर उपचार काय करण्यात आले, अशी सविस्तर माहिती समितीने घेतली आहे. त्याचबरोबर रुग्णालयाचे अधिष्ठातांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करत समितीने मृत्यु झालेल्या रुग्णांच्या शवविच्छेदनाच्या अहवालाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कल्याण : लोढा पलावा-निळजे दरम्यानचा रेल्वे बोगदा वाहतुकीसाठी बंद

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १८ उपचारधीन रुग्णांचा मृत्यु झाला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर टिका झाली. या घटनेची गंभीर दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. त्यात आरोग्य संचालक, महापालिका आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी, जेजे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ डॉक्टर आणि ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांचा समावेश आहे. या समितीची पहिली बैठक गुरूवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली. सायंकाळी उशीरापर्यंतही बैठक सुरू होती. या बैठकीत कळवा रुग्णालयातील रुग्ण मृत्यु घटनेची माहिती समितीने घेतली.

हेही वाचा >>> पिण्याच्या पाण्यासाठी महिला करतात जीवघेणा प्रवास! भिवंडीचा धक्कादायक VIDEO व्हायरल, यूजर्स म्हणाले,” सरकारने…”

या रुग्णालयाची रुग्ण क्षमता कीती आहे आणि तिथे किती रुग्ण ठेवण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी आहे का, अशी माहिती समितीने घेतली होती. तीन तासांच्या या बैठकीनंतर समितीने कळवा रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पाहाणी केली आणि त्याठिकाणी चौकशीही केली. रात्री ११ वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती. शुक्रवारी दुपारी २ वाजता समिती सदस्यांनी कळवा रुग्णालयात जाऊन चौकशी केली. या रुग्णांना रुग्णालयात केव्हा दाखल करण्यात आले, त्यावेळी त्यांची परिस्थिती कशी होती आणि त्यांच्यावर उपचार काय करण्यात आले, अशी सविस्तर माहिती समितीने घेतली आहे. त्याचबरोबर रुग्णालयाचे अधिष्ठातांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करत समितीने मृत्यु झालेल्या रुग्णांच्या शवविच्छेदनाच्या अहवालाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Committee take postmortem report of death patients in possession in kalwa hospital zws