आता पावसाळा सुरू होत आहे. पाऊस सुरू झाला की, माळांवर गवत उगवायला लागतं. पावसाळी झुडुपे वाढायला लागतात आणि या सजलेल्या रंगमंचावर अवतरतात फुलपाखरं. यात वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातलेच एक म्हणजेच कॉमन क्लाऊडेड यलो फुलपाखरू. हे फुलपाखरू पिअरीडे कुळातील असून मध्यम आकाराचे असते. पावसाळ्यामध्ये हमखास दिसणाऱ्या रानमुग, रानतीळ, टाकळा अशा झुडुपांवर/ वेलींवर या फुलपाखरांच्या अळ्या वाढतात आणि मोठय़ा होतात. अळीपासून कोष आणि पुढे प्रौढ फुलपाखरू या अवस्थेपर्यंत वाढ पूर्ण होण्यास या फुलपाखरांना दोन-अडीच महिने लागतात. वर्षांत तीन तरी पिढय़ा निर्माण होतात.
कॉमन क्लाऊडेड यलो फुलपाखरू महाराष्ट्रापासून खाली दक्षिण भारतात मोठय़ा प्रमाणात आढळतात. उत्तर किंवा मध्य भारतात यांचा वावर नाही. महाराष्ट्रातही मुख्यत: सह्य़ाद्रीच्या भरपूर पावसाच्या प्रदेशात माळांवर ही फुलपाखरे दिसतात. या फुलपाखरांच्या मागील आणि पुढील पंखांची वरची बाजू गर्द पिवळ्या (सोनेरी पिवळ्या) रंगाची असते. काही वेळा यात थोडी नारंगी झाक ही पाहायला मिळते. या दोन्ही पंखांच्या कडांना काळी किंवा फिकट तपकिरी रंगाची किनार असते आणि ही फुलपाखरं फुलांवर बसताना पंख मिटून बसतात. या वेळी दिसणारी पंखांची खालची बाजू ही फिकट पिवळ्या रंगाची असते आणि त्यावर काळे ठिपकेही असतात. यामुळेच या फुलपाखरांना कॉमन क्लाऊडेड यलो हे नाव मिळाले आहे.