आपला प्रदेश हा भरपूर पावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. साधारण: जून महिन्यापासून सुरू होणारा पाऊस सप्टेंबपर्यंत सुरूच असतो आणि सगळा परिसर हिरवागार होतो. यात अनेक पावसाळी झुडपांप्रमाणेच माळरानावर उगवणाऱ्या गवताचाही समावेश असतो आणि अर्थातच पावसाळ्यामधील मुख्य पीक भात हेसुद्धा एक गवतच असल्यामुळे तेही या वातावरणात जोमाने वाढते.
पावसाळ्यात उपलब्ध होणारे मुबलक पाणी, वाढीसाठी पोषक हवामान आणि खाद्य वनस्पतींची रेलचेल यामुळे वर्षां ऋतूमध्ये सजिवांची वाढ, त्यांची विण मोठय़ा प्रमाणात होताना दिसते. अक्षरश: लक्षावधी जीव या मोसमात आपण बघू शकतो.
कॉमन ग्रास डार्ट हे असेच एक फुलपाखरू आहे. जे सरता पावसाळा आणि त्यानंतरच्या काळात हमखास पहायला मिळते.
कॉमन ग्रास डार्ट हे फुलपाखरू स्पीरिडे कुळामधील आहे. अत्यंत वेगाने झटका देऊन उघडण्याच्या सवयीमुळे त्याला डार्ट हे नाव मिळाले आहे आणि संपूर्ण भारतीय उपखंडात याचा वावर असल्यामुळे हे कॉमनही आहे.
फार उंचावरचा प्रदेश आणि गर्द जंगलांचा/ झाडीचा भाग सोडला तर जवळपास सगळीकडे म्हणजे अगदी समुद्रसपाटीपासून १०००/१२०० मी. उंची पर्वतच्या प्रदेशात कॉमन ग्रास डार्ट सहजपणे संचार करते. मात्र गवताळ कुरणे, भाताची शेते आणि सूर्यप्रकाश या त्यांच्या खास आवडीच्या गोष्टी. या फुलपाखराला गवत इतके आवडते की रस्त्याच्या कडेला उगवणाऱ्या गवतातही ते पाहाता येतात.
अतिशय लहान आकाराचे हे फुलपाखरू करडय़ा रंगाचे असते. शिवाय त्याच्या पंखांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात. बसलेले असताना ते वरील पंख उभे ठेवून एका विशिष्ट पद्धतीमध्ये बसते. शिवाय पंखांवर असणाऱ्या वाहिन्यांच्या (व्हेन्स) कडांना पांढरी किनार असते. शिवाय आधी म्हटल्याप्रमाणे मोकळ्या गवताळ कुरणांवर फिरण्याच्या त्याच्या सवयीमुळे याला ओळखणे सोपे असते. विशेषत: पावसाळ्यापूर्वी मार्च ते जून आणि पावसानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर हा काळ या फुलपाखरांना जास्त मानवतो.
या फुलपाखराची मादी गवताच्या किंवा भाताच्या पातींवर अंडी घालते. आता आपल्याकडे विविध धरणांमध्ये अडवलेल्या पाण्यावर उन्हाळ्यातही भाताचे पीक घेतले जाते. त्यामुळे बिगर मोसमातही कॉमन ग्रास डार्ट व इतर अनेक फुलपाखरे पहायला मिळतात.
उदय कोतवाल
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2016 रोजी प्रकाशित
फुलपाखरांच्या जगात : कॉमन ग्रास डार्ट
फुलपाखराला गवत इतके आवडते की रस्त्याच्या कडेला उगवणाऱ्या गवतातही ते पाहाता येतात.
Written by उदय कोतवाल

First published on: 25-05-2016 at 02:43 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Common grass dart