गवताळ माळावर फिरताना आपल्याला अनेक फुलपाखरे बघायला मिळतात. त्यात हमखास दिसते ते म्हणजे ‘कॉमन ग्रास यलो’ हे पिवळ्या रंगाचे फुलपाखरू. हे फुलपाखरू मध्यम आकाराचे (४०.५० मि.मी. पंखविस्तार) असते. याच्या पंखांचा रंग गडद पिवळा (हळदीसारखा) असून, पंखांच्या वरच्या टोकाला काळसर तपकिरी रंगाची किनार असते. पंखांची खालची बाजू, जी फक्त फुलपाखरू पंख मिटून बसले की दिसते ती फिकट पिवळ्या रंगाची असते आणि त्यावर अतिशय बारीक असे तपकिरी रंगाचे ठिपके असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत (ड्राय सीझन) असे ठिपके दिसत नाहीत.
या फुलपाखरांची मादी आकाराने मोठी असते, मात्र हिचे रंग हे नराच्या पंखांच्या रंगांपेक्षा फिकट असतात. कॉमन ग्रास यलो फुलपाखराची मादी सर्व प्रकारच्या झाडांवर अंडी घालते. यातही विशेषत: गवत, सर्व प्रकारची कडधान्ये यात रानमूग, टाकळा, गुंज अशा वनस्पती प्रामुख्याने येतात. तसेच ‘युफोरबीया सी’ कुळातील सर्व झाडांवर अंडी घालते.
अंडय़ांमधून बाहेर येणाऱ्या अळ्या फिकट हिरव्या रंगाच्या असतात आणि त्यांच्या अंगावर बारीक लव असते. सुरवंटाची जसजशी वाढ होत जाते तसतसे त्याच्या अंगावरची लव आखूड होत जाते आणि सुरवंटाचा रंगही फिकट हिरव्याकडून हिरवट पिवळ्या रंगाकडे बदलत जातो. हे फुलपाखरू समुद्रसपाटीपासून १००० मि. उंचीपर्यंत सर्रास सगळीकडे आढळते. (माथेरानची उंची समुद्रसपाटीपासून ८०० मी. आहे.)
आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, मादागास्कर बेटे तसेच अरेबिया आणि संपूर्ण भारतीय उपखंडात हे फुलपाखरू बघायला मिळते. तसेच गवताळ, कुरणे, जंगलामधील मोकळा भाग, रस्त्याच्या कडेला, नदीकाठावर, शहरामधील बागेत असे कुठेही हे फुलपाखरू दर्शन देऊ शकते म्हणूनच याचे नाव ‘कॉमन ग्रास यलो’ आहे.
ही फुलपाखरे थव्याने स्थलांतर करतानाही दिसतात.