कामन जय हे पँपिलिओनिडे कुळातील ट्रापिकल प्रदेशात आढळणारे एक अगदी सहज दिसणारे फुलपाखरू आहे. मध्यम आकाराचे हे फुलपाखरू दक्षिण आशियामध्ये आणि त्यातही श्रीलंका, दक्षिण भारतात अगदी सहजी आढळून येते. अर्थातच भरपूर पाऊस आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सह्य़ाद्रीमध्ये यांचं वास्तव्य आहेच.
कामन जय हे दिवसभर न थकता या फुलावरून त्या फुलावर भिरभिरत राहते. या दरम्यान विश्रांती अगदी क्षणभराचीच असते. फुलावर मध पीत असतानासुद्धा यांच्या पंखांची उघडझाप सतत चालू राहते. या फुलपाखरांना गर्द झाडी, भरपूर पावसाची सदाहरित वने, पावसाळी प्रदेशातीलच पानझडीची जंगलं फार आवडतात. कामन जय फुलपाखराचे पंख वरच्या बाजूस काळ्या रंगाचे असतात आणि त्यावर निळसर हिरव्या रंगाचे लंबगोलाकार ठिपके असतात. या फुलपाखरांच्या पंखांची खालची बाजू ही गडद तपकिरी रंगाची असते आणि पंखांच्या वरच्या बाजूस असतात तसेच निळसर हिरवे, काहीवेळा चंदेरी रंगाचे लंबगोलाकार ठिपके असतात. याशिवाय लाल रंगाचे आणि गडद काळ्या रंगाचे अनेक छोटे ठिपके पंखांच्या खालच्या बाजूस असतात. ही फुलपाखरे स्वैलोटेल कुळातील असली तरी त्यांच्या पंखाला टोक मात्र नसते.
कामन जय फुलपाखराची मादी लौरेसिऐसी उदा. तमालपत्र, मैंगोलिऐसी उदा. सोनचाफा, या कुळातील झाडांच्या पानांवर अंडी घालते. ही अंडी गोलसर आकाराची आणि फिक्कट पिवळसर रंगाची असतात. यातून बाहेर येणारे सुरवंट शंखाकृती आकाराचे, पिवळसर हिरवट रंगाचे असतात.
अंडी उबवण्यास ४/५ दिवस, अळीची वाढ पूर्ण होण्यास १४/१५ दिवस आणि कोषामधून फुलपाखरू बाहेर येण्यास ८/९ दिवस लागतात. म्हणजेच साधारणत: महिनाभरात अंडी अवस्थेपासून प्रौढ अवस्थेचा या फुलपाखराचा प्रवास पूर्ण होतो.
ही फुलपाखरे थव्याथव्याने चिखलावर बसून मडपेडलिंग करताना दिसतात. मडपेडलिंग म्हणजे चिखलातले पाणी शोषून घेणे. हे घेत असतानाच या पाण्याबरोबरच अनेक खनिजद्रव्ये आणि क्षार शोषले जातात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे फुलपाखरांचे मुख्य अन्न हे फुलांमधील मध आहे. ज्यातून फार कमी क्षार मिळतात. म्हणून फुलपाखरे मडपेडलिंगमधून सप्लिमेंट घेतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Common jay butterfly