२५ जणांची लॉटरी पद्धतीने निवड होणार; पाणवठय़ांभोवती कॅमेरे
जंगलातील जैवविविधतेचे परीक्षण करण्याची संधी यंदाच्या वर्षी सर्वसामान्य ठाणेकरांनाही उपलब्ध होणार आहे. दरवर्षी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी वनविभागामार्फत जंगलातील प्राण्यांच्या गणनेचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात येतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे एक टोक असलेल्या येऊर जंगलात गेल्या वर्षीपर्यंत पाणथळ्यांभोवती कॅमेरे बसवून त्या माध्यमातून प्राणी गणना केली जात असे. यंदा मात्र वनविभागाचे अधिकारी प्रत्यक्ष मचाण उभारून ही गणना करणार असून या उपक्रमात २५ नागरिकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. येऊरच्या जंगलात प्रथमच प्राणी गणनेचे दालन नागरिकांसाठी खुले करून दिले जात आहे.
रात्रीची निरव शांतता, चांदण्याच्या लख्ख प्रकाशात स्वच्छ भासणारे जंगलातील पाणवठे, मनात धाकधूक निर्माण करणारी रातकिडय़ांची कुजबुज अशा निसर्गरम्य शांत वातावरणात जंगलातील जैवविविधतेचे निरीक्षण करणे ही पर्यावरणप्रेमींसाठी पर्वणीच म्हणता येईल. बुद्धपौर्णिमेच्या दिवशी वनविभागामार्फत राज्यभरातील जंगल परिसरात प्राण्यांची गणना केली जाते. वनविभागातर्फे नेमण्यात आलेल्या समितीमार्फत प्रत्यक्ष जंगलस्थळी उपस्थित राहून प्राण्यांची नोंद घेतली जाते. येऊर वनविभागातर्फे गेली अनेक वर्षे हा उपक्रम कॅमेऱ्याच्या माध्यमातून राबविला जात होता. यंदा मात्र वनविभाग आणि सामाजिक संस्था यांच्या एकत्रित कृतीतून २१ मे रोजी येऊर जंगलात प्रत्यक्ष जंगलस्थळी उपस्थित राहून येऊरमधील प्राण्यांची गणना करण्यात येणार आहे. वनविभागाच्या या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींकडून आनंद व्यक्त केला जात आहे. वनविभागाकडे उपक्रमासाठी नोंदणी केलेल्या नागरिकांपैकी लॉटरीच्या माध्यमातून पंचवीस नागरिकांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांचा रक्तगट, शारीरिक आणि मानसिक स्थिती, संपर्क क्रमांक याची नोंद घेण्यात येणार आहे. येऊरमधील मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी वनविभागातर्फे बांधण्यात आलेली संरक्षित भिंत, प्राण्यांसाठी स्वच्छ केलेले पाणवठे या उपक्रमांचा सकारात्मक परिणाम प्राण्यांच्या अधिवासावर झाला आहे का हे तपासण्यासाठी ही गणना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा