या लेखमालेच्या अगदी सुरुवातीला आपण ब्ल्यू मॉरमॉन या फुलपाखराविषयी माहिती घेतली होती. (ब्ल्यू मॉरमॉन हे आपले राज्य फुलपाखरू आहे.) याच्याच जवळचा भाऊबंद म्हणजे बॉमन मॉरमॉन. मुळात मॉरमॉन नावातच मोठी गंमत आहे. मॉरमॉन या इंग्रजी शब्दाचा अर्थ बहू-विवाहित व्यक्ती असा आहे. या फुलपाखरांना हे नाव देण्यामागचं कारण म्हणजे मॉरमॉन फुलपाखरांच्या माद्यांची दिसणारी वेगळी रूपं. या फुलपाखरांच्या माद्या मुख्यत: ३ रूपांमध्ये दिसतात. पहिलं रूप त्यांचे अस्सल रूप जे अगदी नराच्या रूपासारखं असतं. पण काही माद्या कॉमन रोझ तर काही माद्या क्रिमझन रोज या फुलपाखरासारखे रूप धारण करतात. म्हणजेच या रूपाची नक्कल करतात. म्हणजे एकूण तीन प्रकारच्या किंवा रूपाच्या माद्या फुलपाखरांच्या या जातीत दिसतात आणि म्हणून हे मॉरमॉन.
शिवाय हे फुलपाखरू संपूर्ण आशिया खंडात आणि अर्थातच आपल्या सह्य़ाद्रीमध्ये अगदी हमखास आणि सहज बघायला मिळते म्हणून हे कॉमन मॉरमॉन. आता अर्थातच अस का, हा प्रश्न आपल्या मनात येतो. त्याचे उत्तर म्हणजे कॉमन मॉरमॉन हे अगदी साधं फुलपाखरू आहे जे पटकन भक्ष होऊ शकते. निसर्गात काही फुलपाखरांनी स्वत:ला स्वत:च्या बचावासाठी विषारी द्रव्यांची वनस्पती खाऊन विषारी करून घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या वाटेस भक्षक जात नाहीत. कॉमन रोझ आणि क्रिमझन रोझ ही अशा फुलपाखरांपैकीच आहेत आणि म्हणूनच कॉमन मॉरमॉनची मादी त्यांचे रूप घेते आणि स्वत:ला भक्षकांपासून वाचवते. ही नक्कल एवढी हुबेहूब असते की अगदी बारकाईने निरीक्षण केल्यावरच फरक कळतो.
कॉमन मॉरमॉन फुलपाखरांचे नर हे गडद काळसर रंगाचे असतात. त्यांच्या वरील पंखांच्या मागील कडेस पांढऱ्या ठिपक्यांची आतून बाहेर आकाराने लहान होत जाणारी माळ असते. मागील पंखांच्या कडेला पांढरे ठिपके असतात आणि स्वेलोटेल (पाकोळीसारखे पंखाचे टोक असणारी) कुळातील फुलपाखरांचे वैशिष्टय़ मानली गेलेली टोके मागच्या पंखास असतात.
या फुलपाखरांच्या माद्या लिंबूवर्गीय झाडांवर (उदा. लिंबू, पपनस, संत्र, मोसंबी, बेल) अंडी घालतात. अंडय़ांमधून बाहेर येणारे सुरवंट हे ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखराच्या सुरवंटासारखे दिसतात तर कोष हे लाइम ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखराच्या सुरवंटासारखे दिसतात तर कोष लाइम बटरफ्लायसारखे दिसतात.
कॉमन मॉरमॉन फुलपाखराचे सुरवंटांवर काही प्रकारच्या गांधील माश्या आपली अंडी घालतात आणि या गांधील माशीच्या आळ्या सुरवंटाला पोखरून मोठय़ा होतात. त्यामुळेच काही वेळा या फुलपाखराच्या कोषामधून फुलपाखरांऐवजी गांधील माश्या बाहेर पडतानाचे चमत्कारिक दृश्य पाहायला मिळते.
उदय कोतवाल