कॉमन पायरट हे लायकेनिडे म्हणजेच व्हाइट आणि ब्ल्यू प्रकारातील लहानसे फुलपाखरू आहे. हे फुलपाखरू संपूर्ण दक्षिण आशियात हमखास सापडते. भारतामध्येही हिमालयाच्या पायथ्यापासून, ओसाड वाळवंटांचा अपवाद वगळता संपूर्ण भारतीय उपखंडात सर्व ठिकाणी हे फुलपाखरू सापडते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या फुलपाखराचे दोन्ही पंख वरच्या बाजूस पांढऱ्या रंगाचे असतात. पुढच्या पंखांची वरची आणि बाजूची कडा काळ्या पट्टीने रेखलेली असते. पंखांच्या वरच्या  कडेला काळ्या रंगाचे ठिपके असतात. तसेच पुढचे आणि मागचे पंख धडाला जेथे चिकटतात, तिथे पंखांवर निळ्या रंगाचे फिक्कट डाग असतात.

मागचे पंख काहीसे लांबट असतात, याची संपूर्ण किनार ही काळ्या पट्टीने मढलेली असते. पंखांच्या खालच्या टोकाला काळ्या पट्टीच्या आत आणखी एक अरुंद काळी पट्टी असते. त्याच्यानंतर आधी तीन आणि नंतर दोन काळे ठिपके असतात.

पंखांची खालची बाजू, जी पंख मिटल्यावर दिसते, ती पांढऱ्या रंगाची असते आणि पांढऱ्या रंगावर तुटक काळ्या रेषा असतात. शिवाय मागच्या पंखांच्या टोकाला प्रत्येक पंखांवर एक एक छोटी शेपटी असते. दोन्ही पंखांच्या दोन शेपटय़ा भक्ष्यकाला चकविण्यासाठी असतात. त्यामुळे फुलपाखराचे तोंड नक्की कुठे आहे हे भक्ष्यकाला कळत नाही, आणि तो जर फसला तर या फुलपाखराच्या जिवावरचं संकट शेपटावर निभावते. ही फुलपाखरे वर्षभर सापडतात, पण पावसाळ्यानंतर लगेचच म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात ती मुबलक असतात. या फुलपाखराची मादी बोर आणि त्या वर्गातील इतर झाडांच्या पानांवर एक एक अंडे घालते. अंडी अवस्थेपासून फुलपाखरू अवस्थेपर्यंत पोहोचायला याला साधारणपणे २० ते २१ दिवस लागतात. म्हणजेच एका वर्षांत याच्या १२ ते १३ पिढय़ा जन्माला येतात.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Common pirate butterfly