काँमन सेलर हे भारतीय उपखंडात आणि दक्षिण आशियाई भागामध्ये सापडणारे निम्फेलिडे कुळातील ( म्हणजेच ब्रशफुटेड) एक मध्यम आकाराचे फुलपाखरू आहे.
या फुलपाखराच्या पंखांची वरची बाजू ही चॉकलेटी छटेच्या काळसर रंगाची असते. या पंखांवर अगदी वरच्या कडेला धडापासून सुरू होणारी आडवी जाडसर पांढरी रेघ असते, ही रेघ जेथे संपते तेथे एक पांढरा ठिपका आणि लगेच पुढे पांढराच एक त्रिकोणाकार असतो. त्याच्याही पुढे दोन पांढरे ठिपके असतात.
याच्या खालच्या बाजूस पुढच्या आणि मागच्या दोन्ही पंखांवर मिळून पांढऱ्या ठिपक्यांच्या आडव्या दोन समांतर पट्टय़ा असतात. पुढच्या आणि मागच्या दोन्ही पंखांची कडा कातर असते आणि अगदी कडेला पांढरी तुटक रेघ असते. पंखांच्या खालच्या बाजूसही वरच्या बाजूप्रमाणेच पांढऱ्या ठिपक्यांची आणि रेषांची नक्षी असते. मात्र या पंखांचा रंग हा फिक्कट तांबूस असतो.
या फुलपाखरांचे नर आणि मादी दोन्ही दिसायला अगदी सारखेच असतात. फक्त या फुलपाखरांमध्ये पावसाळी दिवस आणि कोरडे दिवस अशा दोन वेगवेगळ्या वेळी, दोन काहीशी वेगळी रूपे पाहायला मिळतात. पावसाळी रूपातल्या फुलपाखरांचे रंग हे जास्त गडद असतात.
या फुलपाखरांना उन्हामध्ये विहरणे फार आवडते. एखादा नावाडी जोरात वल्ही मारून नंतर संथपणे नाव पुढे जाऊ देतो, तसेच हे फुलपाखरू भराभर पंख मारून पुढे गेल्यावर संथपणे तरंगत राहते. म्हणून या फुलपाखरास सेलर हे नाव मिळाले आहे. या फुलपाखराची मादी द्विदल पिकांच्या रानटी जातींच्या झाडांच्या पानांवर अंडी घालते. या फुलपाखराचे सुरवंट याच झाडांची पाने खाऊन वाढतात. या फुलपाखरांचे आयुष्य साधारण महिनाभराचेच असते.