दर्जेदार अभिनय, उत्कृष्ट कलाकार यांची मांदियाळी अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनात पाहायला मिळते. या अभिजनांच्या व्यासपीठावर सामान्य महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. प्रारंभ कला अकादमीतर्फे ‘सखी गं सखी’ हा दीर्घाक नाटय़ संमेलनात सादर होणार आहे.
डॉ. पराग घोंगे लिखित सखी गं सखी या दीर्घाकात महिलांचे भावविश्व विविध पात्रांच्या माध्यमातून रेखाटण्यात आले आहे. महिलांची अनेक नाती उलगडणारी या नाटकाची कथा संवेदनशील आहे. आई आणि मुलीमधील भावनिक नाते, दोन शेजारी महिलांचे नाते अशा विविध छटांना स्पर्श करणारे हे नाटक वृद्धाश्रमात जाणाऱ्या महिलेची भावना संवादातून स्पष्ट करते. प्राजक्ता परांजपे, वर्षां पालशेतकर, अनुजा महाजन, मधुरा कुलकर्णी, मीनल आंबवणे, संज्योत सालपेकर, अपूर्वा आपटे, वैशाली घांगरेकर, अलका राजर्षी या कलाकार ही नाटिका सादर करणार आहेत. अभिनय माहीत नसणाऱ्या सामान्य महिलांना अशा सादरीकरणातून व्यासपीठ मिळावे. आत्मविश्वास वाढावा यासाठी डॉ. अरुंधती भालेराव या प्रयत्नशील आहेत. सामान्य महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, याची नोंद नाटय़ संमेलनाच्या ठाणे शाखेने घेतली आहे, असे डॉ. भालेराव यांनी सांगितले. २१ फेब्रुवारी रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह येथे सकाळी ११.३० वाजता हा दीर्घाक सादर होणार आहे.

Story img Loader