डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीतील फेज एकमधील दीड वर्षीपूर्वी बांधण्यात आलेला विको नाका भागातील नंदी पॅलेस हाॅटेल ते स्टेट बँक एमआयडीसी शाखेपर्यंतचा सीमेंट काँक्रीटचा रस्ता तोडून टाकण्यात आला आहे. या रस्ते कामासाठी लाखो रूपये खर्च करण्यात आले आहेत. हा रस्ता तोडण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्यात आली आहे, अशी टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील दोन वर्षापासून एमआयडीसीत सीमेंट काँक्रीटचे रस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने बांधण्यात आले. या रस्ते कामासाठी ११० कोटीचा निधी शासनाने मंजूर केला होता. मिलापनगर, सुदर्शनगर, औद्योगिक विभागातील सुमारे ३५ किमी लांबीचे काँक्रीटचे रस्ते बांधून पूर्ण झाल्यानंतर काही महिन्यांमध्ये हे रस्ते सेवा वाहिन्या टाकणे आणि इतर कामांसाठी खोदण्यात आले होते. काँक्रीटचे अनेक वर्षांनी बांधलेले रस्ते विविध कामांसाठी तोडण्यात येत असल्याने रहिवासी, प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा >>>देशातील पहिल्या समुद्री भुयारी मार्गिकेतून इतक्या वेगात धावणार बुलेट ट्रेन, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

काँक्रीट रस्ते बांधण्यापूर्वीच हे नियोजन का करण्यात आले नाही, असे नागरिकांचे प्रश्न आहेत. गेल्या आठवड्यात एमआयडीसीतील विको नाका भागातील नंदी पॅलेस ते स्टेट बँक हा वर्दळीचा नवा कोरा सीमेंट काँक्रीटचा रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. नवीन काँक्रीटचा रस्ता वर्षभराच्या आत तोडण्यात आल्याने नागरिक, उद्योजक नाराजी व्यक्त करत आहेत.

या रस्त्यावर बांधणीनंतर अनेक ठिकाणी तडे गेले होते. या रस्त्यावरून वाहन धावत असताना रस्ता समतल नसल्याने वाहन धडधड आवाज करत होते. या काँक्रीट रस्त्यावर पुरेसे पाणी न मारल्याने सिमेंटचा उधळा उडत होता. परिसरातील शाळा चालक, उद्योजक, स्टेट बँक, कामा कार्यालय, या भागातील सभागृह चालक सिमेंटच्या उधळण्याने हैराण होते. आता पुन्हा हा रस्ता तोडण्यात आल्याने या रस्त्यावरून कार्यालय, शाळा, आस्थापनांमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वळसा घेऊन किंवा वाहने दूरवर ठेऊन मग कार्यालयात यावे लागते.

हेही वाचा >>>डोंबिवलीत दत्तनगरमध्ये महारेरामधील, बेकायदा इमारतीचे विकासकाकडून तोडकाम

एमआयडीसीतील सीमेंट काँक्रीटचे रस्ते कामे एका वजनदार लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने काही ठेकेदारांना मिळाली होती. राजकीय आशीर्वाद असल्याने या कामाच्या ठेकेदाराने ही काँक्रीट रस्त्यांची कामे ‘उरकून’ पूर्ण केली आहेत, अशा प्रतिक्रिया एमआयडीतील रहिवासी, उद्योजकांकडून देण्यात येत आहेत. काँक्रीट रस्त्यांची बांधणी केल्यावर त्यावर पुरेसे पाणी मारले नाही. या रस्त्याविषयी तक्रारी वाढल्याने हा रस्ता पुनर्बांधणीसाठी खोदण्यात आला आहे, अशी माहिती खासगीत काही अधिकाऱ्यांनी दिली.

काँक्रीटचा नवीन रस्ता का खोदला आहे. याविषयीच्या माहितीसाठी एमआयडीसी डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड यांना संपर्क केला. त्यांनी नेहमीप्रमाणे प्रतिसाद दिला नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commuters are deeply upset over the demolition of a new cement concrete road in dombivli midc amy