कल्याण – मुंबई सीएसएमटी ते कल्याण लोकलमध्ये मंगळवारी दुपारी स्वयंचलित दर्शक यंत्रणेतून रेल्वे स्थानकांच्या चुकीच्या उद्घोषणा करण्यात येत होत्या. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. लोकल धावत होती कल्याणच्या दिशेने आणि लोकलमधील स्वयंचलित उद्घोषकांकडून मात्र कळवा स्थानकाचा कांजुरमार्ग स्थानक, मुंब्रा स्थानकाचा नाहूर, दिवा स्थानकाचा भांडूप, कोपरचा मुलुंड स्थानक असा उल्लेख करण्यात येत होता. या गोंधळामुळे प्रवासी मात्र हसाव की रडाव या मनस्थितीत होते.
मंगळवारी दुपारी १.४३ वाजता सीएसएमटी-कल्याण लोकल ठाणे रेल्वे स्थानकात धिम्या गतीच्या फलाट क्रमांक दोनवर आली. ही लोकल कल्याणच्या दिशेने धावत असताना ठाणे रेल्वे स्थानकातील उद्घोषकाने कल्याण लोकल आली असल्याची उद्घोषणा केली. प्रवासी ठाणे रेल्वे स्थानकात कल्याण लोकलमध्ये चढले. मात्र लोकलमधील स्वयंचलित दर्शक यंत्रणेवरील तांत्रिक उद्घोषकांकडून चुकीच्या रेल्वे स्थानकांचा उल्लेख करण्यात येत होता. यामुळे लोकलमधील प्रवाशांचा गोंधळ उडत होता. या गोंधळात लोकलमध्ये चढलेला प्रवासी लोकलमधील चुकीची उद्घोषणा ऐकून लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न करत होता.
ठाणे रेल्वे स्थानक सोडल्यावर लोकल कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, डोंबिवली आणि कल्याण रेल्वे स्थानकांच्या दिशेने धावत होती. ठाणे रेल्वे स्थानक सोडल्यावर कळवा रेल्वे स्थानक आल्यावर लोकलमधील स्वयंचलित उद्घोषकाकडून आता कांजूरमार्ग रेल्वे स्थानक असल्याची उद्घोषणा केली. कळवा रेल्वे स्थानकतील कार्यालयातील उद्गघोषकाकडून मात्र कल्याणला जाणारी लोकल स्थानकात आली असल्याची उद्घोषणा केली. मुंब्रा रेल्वे स्थानक आल्यावर नाहूर, दिवा रेल्वे स्थानक आल्यावर भांडूप, कोपर रेल्वे स्थानकात मुलुंड, डोंबिवली रेल्वे स्थानकात ठाणे अशा उदघोषणा देण्यात येत होत्या.
लोकलमधील उद्घोषणा आणि फलाटावरून देण्यात येणाऱ्या उदघोषकांकडील घोषणा यांच्यात तफावत येत असल्याने लोकलमधील प्रवासी मात्र गोंधळला होता. तांत्रिक दर्शक यंत्रणेवर सर्व्हेर बिघाडाचा संदेश येत होता. काही वेळ ही यंत्रणा ठप्प झाली. पुन्हा ही यंत्रणा सुरू होऊन चुकीच्या पद्धतीने उद्घोषणा देणे सुरू झाले होते, अशा तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या.
हेही वाचा – अप्पर कोपर रेल्वे स्थाकातील फलाटावर छप्पर टाकण्याच्या कामाला प्रारंभ
लोकलमध्ये चढलेला प्रवासी लोकलमधील उद्घोषणा ऐकून आपण चुकीच्या लोकलमध्ये चढलो की काय, असा विचार करून घाईने लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न करत होता. इतर प्रवासी त्या प्रवाशाला समजावून लोकलमधील स्वयंचलित तांत्रिक उद्घोषणेमधील चूक निदर्शनास आणून देत होता.
चुकीच्या उद्घोषणा आणि प्रवाशांचा गोंधळ ठाणे ते कल्याण रेल्वे स्थानकांपर्यंत सुरू होता. अनेक प्रवासी या गोंधळामुळे मनमुराद हसत होते. रेल्वे अधिकाऱ्याने ही लोकलमधील स्वयंचलित उद्घोषणेमधील तांत्रिक चूक असल्याचे सांगितले. हा बिघाड तातडीने दुरुस्त करण्यात येत आहे, असे सांगितले.