डोंबिवली– येथील पूर्व भागातील गांधीनगर, स्टार काॅलनी भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पावसाने उघडिप देऊन महिना झाला तरी कल्याण डोंबिवली पालिकेकडून रस्ते सुस्थितीत करण्याची कामे सुरू करण्यात येत नाहीत. यामुळे प्रवासी, वाहन चालक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
डोंबिवलीतील बहुतांशी वाहने शिळफाटा दिशेने, एमआयडीसी, २७ गावात जाण्यासाठी गांधीनगर, स्टार काॅलनी भागातील रस्त्यांचा वापर करतात. या भागात शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, रुग्णालये आहेत. स्वामी समर्थ मठ नांदिवली भागात आहे. दररोज अनेक भाविक गांधीनगर, स्टार काॅलनीतील रस्त्यांवरुन येजा करतात.
हेही वाचा >>> डोंबिवलीत दस्त नोंदणीसाठी दाखल बनावट कागदपत्रे पकडली, दलाल-भूमाफियांमध्ये खळबळ
या रस्त्यांची दुर्दशा पाहून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. रस्त्यावर खडी, माती जागोजागी पडली आहे. रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने खडी, मातीचे रस्ते या भागात दिसत आहेत. दुचाकी स्वार या खडीवरुन घसरुन पडत असल्याच्या तक्रारी आहेत. या भागातील अरुंद रस्त्याच्या दोन्ही बाजुला काही ठिकाणी गृहप्रकल्प सुरू आहेत. त्या प्रकल्पांची खडी, मिक्सर यंत्र, अवजड वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने स्टार काॅलनी भागात दररोज कोंडी होते.
रात्रीच्या वेळेत या रस्त्यांवरील पथदिवे बंद असले तर पादचाऱ्यांना खडीला ठेचकळत चालावे लागते. दुचाकी स्वार, चारचाकी चालकांना कसरत करत या रस्त्यावरुन वाहने घेऊन जावी लागतात. काही वेळा वाहनाच्या टायर खालील खडा वेगाने उडून पादचाऱ्याच्या चेहऱ्याला लागण्याच्या घटना घडत असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. पालिका अधिकाऱ्याने गांधीनगर, स्टार काॅलनी भागातील रस्त्यांवरील खड्डे भरणीची कामे सुरू केली आहेत. या मधील काही रस्त्यांचे काँक्रीटीकरण प्रस्तावित आहे, असे पालिका अधिकारी म्हणाला.