ठाकुर्ली रेल्वे स्थानका जवळील पादचारी पुलाजवळ संरक्षक भिंतीचे काम रखडलेल्या स्थितीत ठेवण्यात आले आहे. या मोकळ्या जागेत एक केबल वाहिनी लोंबकळत आहे. रेल्वे स्थानकातील, ठाकुर्ली पूर्व, पश्चिम भागात येजा करणारे बहुतांशी प्रवाशी या केबल वाहिनीला हाताने बाजुला करुन येजा करत आहेत.
रेल्वे स्थानकातील जिने न चढता हा प्रवास सुखकर होत असल्याने प्रवासी रेल्वे मार्गातून भिंतीचे रखडलेले काम भागातून येजा करत आहेत. या भागात एक केबल वाहिनी लोंबकळत आहे. घाई गडबडीत असलेल्या प्रवाशाच्या ही वाहिनी निदर्शनास आली नाहीतर प्रवाशाच्या मानेला फास लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: ठाणे: संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सवावरून अखिल भारतीय नाट्य परिषदेचा महापालिकेवर आरोप; शिंदे-ठाकरे गटाचीही किनार?
दिवसा लाल रंगाची केबल वाहिनी दिसते. रात्रीच्या वेळेत रेल्वे पादचारी पुलाच्या भागात पथदिवे नाहीत. त्यामुळे या भागात अंधार असतो. ठाकुर्ली पूर्व, पश्चिम भागात येजा करणारे, स्थानकात उतरलेले अनेक प्रवासी रेल्वे जिन्याचा वापर न करता फलाटावरुन थेट रेल्वे मार्गात उतरुन संरक्षक भिंतीच्या रखडलेल्या भागातून येजा करतात. स्थानकातून रेल्वे व्यवस्थापक, रेल्वे सुरक्षा जवान हा प्रकार पाहत असतात. तेही प्रवाशांवर काही कारवाई करत नाहीत. किंवा रखडलेले काम पूर्ण व्हावेत यासाठी संबंधित ठेकेदार, बांधकाम विभागाला कळवित नसल्याने अनेक प्रवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत. यासंदर्भात रेल्वेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.