लोकसत्ता प्रतिनिधी
अंबरनाथ: औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे पुन्हा एकदा अंबरनाथ शहरातील नागरिकांना रासायनिक वायू गळतीचा सामना करावा लागला. गुरुवारी रात्री मोरिवली, बी केबिन रस्ता परिसर आणि आसपासच्या भागात रासायनिक वायूमुळे नागरिकांना घसा खवखवणे, डोळे चुरचुरणे आणि श्वास घेण्यास त्रास जाणवला. पूर्वेतील मोठ्या भागात वायूची चादर स्पष्टपणे पाहायला मिळत होती. त्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याचे चित्र होते.
गेल्या काही वर्षात अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली या शहरांमध्ये नागरी क्षेत्र औद्योगिक क्षेत्राच्या अगदी जवळ गेले आहे. त्यामुळे एखादी घटना घडली की त्याचा मोठा फटका आसपासच्या भागातील रहिवाशांना बसतो. मात्र औद्योगीक क्षेत्रातील कंपन्यांकडून होत असलेल्या बेजबाबदारपणाची अनेक उदाहरणेही समोर आली आहे. गुरुवारी असाच काहीसा प्रकार अंबरनाथ शहरात समोर आला. एकीकडे शहरात गणपती आणि गौरी विसर्जनाचा उत्साह असताना दुसरीकडे मोरीवळी औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत रासायनिक वायू गळती झाल्याची माहिती समोर आली. यामुळे मोरिवली, अंबरनाथ पूर्वेतील बी केबिन रस्ता परिसर आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर रासायनिक वायू पसरला. रात्रीच्या सुमारास हिवाळ्यात धुके पडावे तसा वायू पसरला होता. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली. मात्र वायू रासायनिक असल्याने रस्त्यावर, घराबाहेर पडलेल्या नागरिकांना त्याचा त्रास जाणवू लागला. घसा खवखवणे, डोळे चुरचुरणे आणि शवसानाला त्रास होत असल्याचे स्थानिक रहिवाशांना जाणवले. त्यामुळे रहिवाशांना दारे खिडक्या बंद करून घ्याव्या लागल्या. गुरुवारी गणपती आणि गौरी विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक रस्त्यावर होते. त्यांनाही याचा मोठा त्रास जाणवला. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे आता नागरिकांमधून संताप व्यक्त होतो आहे.