कल्याण – कामावरून घरी परतत असताना कल्याणच्या प्राजक्ता गुप्ते लोकलमध्ये दरवाजात उभ्या होत्या. त्यांच्या हातामध्ये पर्स आणि मोबाईल होता. सिग्नल नसल्याने पत्रीपुलाजवळ लोकली थांबली. रेल्वे मार्गालगत घुटमळत असलेल्या चोरट्याने लोकलच्या दारात उभ्या असलेल्या प्राजक्ता यांच्या हातामधून मोबाईल, पर्स हिसकावून पळ काढला. जिवाची पर्वा न करता प्राजक्ता यांनी लोकलमधून उडी मारली. रेल्वे मार्गातून चोरट्याचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी सीएसएमटीकडे जाणारी लोकल त्यांच्या लक्षात न आल्याने लोकलची धडक बसून प्राजक्ता यांचा जागीच मृत्यू झाला होता.
प्राजक्ताच्या मृत्यू प्रकरणी मुंबई सीएसएमटी येथील रेल्वे न्यायाधीकरण न्यायालयात गुप्ते कुटुंबीयांनी नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. या दाव्यात रेल्वे न्यायालयाने सुरुवातीला चार लाख भरपाई मंजूर केली होती. गुप्ते कुटुंबीयांच्या वकिलाने त्यांची आर्थिक परिस्थिती विषद केली. रेल्वेच्या नवीन कायद्याप्रमाणे न्यायालयाने प्राजक्ताच्या कुटुंबीयांना आठ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. आठ लाख रुपयांची रक्कम सुरुवातीला ७२ महिने बँकेत ठेवली जाणार आहे.
हेही वाचा – कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांचे मोबाईल चोरणारा जुन्नरचा इसम अटकेत
सामाजिक कार्यकर्ते अमर काझी, सीकेपी संस्थेचे तुषार राजे आणि इतर संस्थांचे मोलाचे साहाय्य गुप्ते कुटुंबीयांना मिळाले. ॲड. रिहाल काझी न्यायालयात महत्वपूर्ण युक्तिवाद केले.
प्राजक्ता यांनी स्वताहून जीव धोक्यात घालून रेल्वे मार्गात उडी मारली होती. या अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार नाही, असे युक्तिवाद रेल्वेकडून करण्यात आले. दावेदाराचे वकील ॲड. रिहाल काझी यांनी रेल्वे मार्गांच्या आसपास चोरटे फिरत असतात. तेथे गस्त नसते. पोलिसांची निष्क्रियता अशा घटनांना कारणीभूत आहे. असे मुद्दे उपस्थित केले होते.
प्राजक्ता मिलिंद गुप्ते (२२) या कल्याणमध्ये कुटुंबीयांसमेवत राहत होत्या. त्या नवी मुंबईत माहिती व तंत्रज्ञान कंपनीत कामाला होत्या. त्यांच्या मिळकतीवर घरगाडा चालत होता. ३० जुलै २०१५ रोजी प्राजक्ता कामावरून संध्याकाळी लोकलने घरी परतत होत्या तेव्हा ही घटना घडली.
घरातील एकमेव आधार गेल्याने गुप्ते कुटुंबीयांवर संकट कोसळले. भरपाईसाठी गुप्ते कुटुंबीयांनी रेल्वे न्यायालयात, प्रशासनाकडे दहा वर्ष फेऱ्या मारल्या. लोकप्रतिनिधींनी खोटी आश्वासने, काही वकिलांनी दगा दिला. ॲड. काझी यांनी निष्ठेने हा दावा चालवून गुप्ते कुटुंबीयांना न्याय मिळवून दिला.