कल्याण – कल्याण-अहिल्यानगर रस्त्यावरील मुरबाड जवळील टोकावडे गाव हद्दीतील सावर्णे येथे सात वर्षापूर्वी एका खासगी बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे उल्हासनगर मधील एका नोकरदार प्रवाशाला आपला हात गमवावा लागला होता. या अपघातप्रकरणी बाधित प्रवाशाने मोटार अपघात गुन्हे न्यायधिकरणाकडे दावा दाखल केला होता. याप्रकरणी खासगी बसचा मालक आणि वाहनाची विमा कंपनी यांनी एकत्रितपणे बाधित प्रवाशाला एक कोटी ३९ लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात गुन्हे न्यायाधिकरणाचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांनी दिले आहेत.

महेश माखिजा असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. बस अपघातात महेश यांचा डावा हात खांद्यापासून निखळला होता. त्यांच्यावर बाॅम्बे रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. याप्रकरणात महेश माखिजा यांनी लक्झरी बसचा मालक रियाझ मोहम्मद, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला प्रतिवादी केले होते. न्यायालयाने तिन्ही बाजू ऐकून पोलीस पंचनामा, सबळ पुरावे, रुग्णालयातील उपचारी कागदपत्रे, डाॅक्टरांचा अहवाल याद्वारे बाधिताला एक कोटी ३९ लाख भरपाई देण्याचे आदेश दिले. ही रक्कम विमा कंपनीने प्रथम बाधिताला द्यावी. त्यानंतर कंपनीने ती रक्कम बस मालकाकडून वसूल करून घ्यावी, असे न्यायाधिकरणाने आदेशात म्हटले आहे.

याप्रकरणात महेश माखिजा यांच्यावतीने ॲड. पी. व्ही. आगवणे, दोन्ही प्रतिवादींकडून ॲड. मेहताब पठाण, ॲड. के. व्ही. पुजारी यांनी बाजू मांडली. बसचे मालक रियाझ मोहम्मद हे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालु्क्यातील चितगावचे रहिवासी आहेत. प्रतिवादींनी विविध कारणे देऊन भरपाईला विरोध दर्शविला. न्यायाधिकरणाने त्यांचे दावे फेटाळून लावले.

महेश माखिजा हे डिसेंबर २०१९ मध्ये खासगी लक्झरी बसने कल्याण ते अहिल्यानगर रात्रीच्या वेळेत बस प्रवास करत होते. त्यांची बस मुरबाड तालुक्यातील टोकावडे गावाजवळील सावर्णे भागातून जात होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस ओंकार हाॅटेलच्या दर्शनी भागाला जाऊन धडकली. अचानक घडलेल्या या अपघातात प्रवाशांना धक्का बसला. महेश माखिजा यांना या अपघातात जोराचा धक्का बसून त्यांचा डावा हात खांद्यापासून निखळला होता. त्यांच्यावर मुंबईत बाॅम्बे रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. या उपचारासाठी त्यांना सुमारे नऊ लाखाचा खर्च आला होता. काही खर्च त्यांनी आरोग्य विमाच्या माध्यमातून भरणा केली. उर्वरित तीन लाख ९८ हजाराची रक्कम भरण्याचे आदेश न्यायाधिकरणाने प्रतिवादींना दिले.

महेश माखिजा एका खासगी कंपनीत विक्री व्यवस्थापक होते. हात गमावल्यामुळे त्यांना पुढील जीवन वाटचालीसह नोकरीतील आर्थिक नुकसानीचा फटका सहन करावा लागणार होता. अपघात घडल्यापासून महेश यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यकाळाचा विचार करून न्यायाधिकरणाने प्रतिवादींना एक कोटी ३९ लाखाची भरपाई देण्याचे आदेश प्रतिवादींना दिले आहेत.