कल्याण : कल्याण शहरातील निवासी आणि डोंबिवलीच्या टिळकनगर शाळेत शिक्षक असलेल्या एका शिक्षकाचा चार वर्षापूर्वी कल्याणमध्ये वसंत व्हॅली चौकात टेम्पोने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला होता. या मृत्यूप्रकरणी शिक्षकाच्या कुटुंबीयांनी मोटार वाहन गुन्हे अपघात न्यायाधिकरणासमोर भरपाईसाठी दावा दाखल केला होता. हे प्रकरण शनिवारी ठाणे येथील राष्ट्रीय लोक अदालतमध्ये शनिवारी सुनावणीसाठी आले. त्यावेळी तडजोडीने मृत शिक्षकाच्या कुटुंबीयांना ९५ लाख रूपये भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या लोक अदालतमधील सर्वाधिक भरपाई देणारा हा दावा ठरला आहे. डोंबिवलीतील टिळकनगर विद्यामंदिरातील अपघातात मृत पावलेले शिक्षक सुंदरलाल बाजीराव मराठे (५१) यांच्या नातेवाईकांना ठाणे जिल्हा मुख्य न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांच्या हस्ते भरपाईचा ९५ लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी सुंदरलाल यांच्या वृध्द आई, पत्नी उपस्थित होत्या. ॲड. सतिश तिवारी यांनी या भरपाईचा दावा पत्नी वंदना सुंदरलाल मराठे, दोन मुले, वृध्द आई यांच्यावतीने मोटार अपघात गुन्हे न्यायाधिकरणासमोर दाखल केला होता. हा धनादेश सुपूर्द करण्याच्यावेळी अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य एस. एन. शहा, जिल्हा विधी सेवा् प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी, त्यांचे वकील ॲड. अरविंद तिवारी उपस्थित होते.
२२ नोव्हेंबर २०२१ रोजी शिक्षक सुंदरलाल मराठे नेहमीप्रमाणे सकाळी साडे सहा वाजता कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली भागात फिरण्यासाठी बाहेर पडले होते. पायी चालत असताना खडकपाडा हिना गार्डन सोसायटीजवळून जात असताना अचानक पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पो चालकाने निष्काळजीपणे टेम्पो चालवून त्यांना जोराची धडक दिली होती. या धडकेत सुंदरलाल मराठे यांचा मृत्यू झाला होता. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी कुटुंबीयांनी तक्रार केली होती. मोटार अपघात गुन्हे न्यायाधिकरणासमोर हा दावा दाखल झाला होता.
टेम्पो वाहनाची विमा कंपनी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी होती. लोक अदालतमध्ये जिल्हा न्यायाधीश, विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी तडजोडीने अपघातग्रस्ताला ९५ लाखाची भरपाई देण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातील कमावता सदस्य अपघातात गेल्यानंतर त्या कुटुंबीयांवर मोठा आघात होतो. कुटुंबातील सदस्य हा कुटुंबाची मोठी संपत्ती असते. त्याचे मूल्य भरपाई कोणत्याही रोख रकमेत होऊ शकत नाही. अशा कुटुंबीयांंवर घरातील कमावत सदस्य गेल्यानंतर अनेक आर्थिक अडचणीचे प्रसंग येतात. यासाठी अपघातग्रस्त प्रकरणांचे दावे लवकर निकाली काढण्यावर, कुटुंबीयांना लवकर न्याय देण्यावर आमचा भर असतो. ठाण्यातील मोटार अपघाताचे दावे लवकर निकाली काढण्यासाठी आम्ही बांधील आहोत, असे जिल्हा मुख्य न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांनी सांगितले.