कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील खड्डे, चऱ्या भरण्याची कामे वर्षानुवर्ष पालिकेत काम करणाऱ्या ठराविक ठेकेदारांना स्पर्धा न करता देण्यात आली आहेत. शहरातील निकृष्ट दर्जाची कामे रोखण्यासाठी खड्डे, चऱ्या भरण्याचे ठेके तातडीने रद्द करावेत, अशी मागणी उल्हासनगर येथील जय भारत कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संचालकांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालिकेची खड्डे, चऱ्या भरण्याची निविदा नोटीस जाहीर झाल्यानंतर ठराविक ठेकेदारांनी एकत्र येऊन आपल्या सोयीप्रमाणे बाहेरील स्पर्धक या स्पर्धेत उतरणार नाही अशा पध्दतीने निविदा भरल्या. प्रशासनाने या ठेकेदारांना अनुकूल भूमिका घेतल्याने त्यांना या कामांचे वाटप झाले. ठराविक अधिकारी, ठराविक ठेकेदारांची पालिकेतील अधिकारशाही बाहेरील ठेकेदाराला या कामासाठी स्पर्धेत उतरविण्यासाठी अनुकूल भूमिका घेत नाही. ठराविक ठेकेदार निकृ्ष्ट पध्दतीचे कामे करुन शहरातील खड्डे समस्या वाढवितात. याच कामासाठी दर्जेदार बाहेरील स्पर्धेक आला तर तो निष्ठेने काम करुन खड्डे, चऱ्या भरण्याची कामे योग्यरितीने करतो.

हेही वाचा… दिव्यात भाजप आणि शिंदे गटातील मतभेद कायम; शिंदे गट आणि भाजपचा वाद पोलिस ठाण्यात

परंतु वर्षानुवर्ष ठराविक ठेकेदार पालिकेत ठाण मांडून असल्याने आणि प्रशासन त्यांना अनुकूल भूमिका घेत असल्याने यामध्ये शहरातील खड्डे, चऱ्या भरण्याची कामे निकृष्टपणे केली जातात. पालिकेच्या पैशाची उधळपट्टी होते. यामध्ये प्रशासन नाहक नागरिकांकडून लक्ष्य होते. हे टाळण्यासाठी पालिकेतील ठराविक ठेकेदारांची हुकुमशाही मोडून काढण्यासाठी आयक्तांनी पुढाकार घ्यावा. खड्डे, चऱ्यांची राबविलेली निविदा पध्दत रद्द करावी. नव्याने निविदा मागवून स्पर्धेस पात्र ठेकेदारांना ही कामे देण्यात यावीत, अशी मागणी जय भारत कन्स्ट्रक्शन कंपनीने आयुक्तांकडे केली आहे.

हेही वाचा… ठाणेकरांची ऑनलाईन कर भारणा सुविधेला पसंती

राज्यातील सर्व रस्ते खड्डे मुक्त असले पाहिजेत. काँक्रीटीकरणाची कामे चांगल्या गुणवत्तेची झाली पाहिजेत यासाठी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने शासन, प्रशासनाला आदेश देत आहेत. असे असताना या आदेशाची कल्याण डोंबिवलीत पायमल्ली केली जात आहे, असे जय भारत कन्स्ट्रक्शन कंपनी (ग्रुप ऑफ के. सी. चंदनानी कन्स्ट्रक्शन ) यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

वर्षानुवर्ष पालिकेत काम करताना किरकोळ कामे करायची आणि अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अधिकच्या कामाची देयके काढायची, अशी सवय या ठेकेदारांना लागली आहे. त्याचीच पुनरावृत्ती आता झाली आहे, असे स्पर्धक ठेकेदारांनी सांगितले.

४५ कोटीच्या चर्‍या

४५ कोटीच्या चऱ्या भरण्याची कामे दोन दिवसात निविदा प्रक्रियेचा देखावा उभा करुन वाटप करण्यात आली आहेत. यामध्ये कोणताही स्पर्धा झालेली नाही. चऱ्या भरण्याचे ठेके रद्द करावेत, असे स्पर्धक ठेकेदारांनी सांगितले. पालिका प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेतला नाही तर याप्रकरणी नगरविकास विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली जाणार आहे, असे ठेकेदारांनी सांगितले.

“अशी काही तक्रार आल्याचे माहिती नाही, आलीही असेल. पण खड्डे, चऱ्या भरण्याची कामे निविदा बोलीने स्पर्धात्मक पध्दतीने देण्यात आली आहेत. यामध्ये कोणतीही गडबड नाही.” – अर्जुन अहिरे, शहर अभियंता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Competing contractors complaint to the commissioner for not giving the works of filling potholes and ditches to certain contractors in kalyan dvr