कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत असताना रामनाथ सोनवणे यांनी विनय कुळकर्णी यांना साहाय्यक आयुक्त या पदावर नेमणूक दिली. या पदावरील नियुक्तीला शासनाची मान्यता नसताना कुळकर्णी यांनी महापालिकेच्या एका प्रकरणात न्यायालयाला प्रतिज्ञापत्र सादर केले. याची नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी दखल घेऊन कोकण विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कोकण विभागीय आयुक्तांच्या प्रादेशिक संचालकांनी ठाण्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांना माजी आयुक्त रामनाथ सोनवणे आणि लेखापाल विनय कुळकर्णी यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या आठ दिवसांत हा चौकशी अहवाल कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे. लेखापाल विनय कुळकर्णी यांनी महापालिकेशी संबंधित एका प्रकरणात न्यायालयात साहाय्यक आयुक्त म्हणून प्रतिज्ञापत्र सादर केले. ही गंभीर बाब तक्रारदाराने शासनाच्या निदर्शनास आणली. नगरविकास विभागाने या तक्रारींची दखल घेऊन कोकण विभागीय आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विभागीय आयुक्तांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना येत्या आठ दिवसांत ही चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिला आहे.
दैनंदिन कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या
सोनवणे यांच्या कार्यकाळात शासनाची परवानगी न घेता काही अधिकाऱ्यांना पालिका साहाय्यक आयुक्त या संविधानिक पदावर सर्वसाधारण सभेच्या मंजुऱ्या घेऊन बढत्या देण्यात आल्या. अधिकाऱ्यांनी दैनंदिन कागदपत्रांवर साहाय्यक आयुक्त म्हणून स्वाक्षऱ्या केल्या. ही कृती नियमबाह्य आहे.