लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली- येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या व्यवस्थेत या नाट्यगृहाच्या व्यवस्थापकाने गैरप्रकार सुरू केले आहेत. अतिशय मनमानी पध्दतीने या नाट्यगृहाचा कारभार चालविला जातो. त्याचा सर्वाधिक फटका शहरातील सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक संस्थांना बसत आहे, अशी तक्रार भाजपचे माजी नगरसेवक राहुल दामले यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.या अधिकाऱ्याला तात्काळ बदलले नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा दामले यांनी दिला आहे.
काही दिवसापूर्वीच डोंबिवलीतील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिकांनी सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांकडून सुरू असलेल्या मनमानी आणि तेथील गोंधळाविषयी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आता नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नाट्यगृहाच्या आवारात दुचाकी वाहन चालकांना वाहने उभी करुन दिली जात नाहीत, अशी तक्रार केली होती.
आणखी वाचा-भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष मोहपे यांना हटविण्यासाठी कथोरे समर्थकांची मोहीम
सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे व्यवस्थापक दत्तात्रय लधवा यांच्या विषयी अनेक तक्रारी वाढत आहेत. मनमानी करुन ते नाट्यगृहाचे कामकाज करत आहेत. त्यामुळे तेथे गैरव्यवहार वाढले आहेत. कलाकार, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांना त्याचा फटका बसत आहे. सामंजस्याने येथील कामकाज केले जात नाही. नाट्यगृहात एखाद्या कार्यक्रमाची नोंदणी करण्यासाठी आलेल्या नाट्य, साहित्य, सांस्कृतिक संस्थेच्या सदस्याला महिन्यातील सर्व तारखा नोंद झाल्या आहेत असे खोटे सांगितले जाते. प्रत्यक्षात त्या नोंद तारखा नकली असतात. या नकली तारखांच्या माध्यमातून गैरव्यवहार केला जातो, असे दामले यांनी तक्रारीत म्हटले आहे.
नाट्यगृहातील ध्वनीक्षेपण, खानपान सेवा स्वताच्या माध्यमातून केल्या जातात. जाहिरात फलक, भित्ती फलक याचे वाढीव दर आकारले जातात. रांगोळी काढणाऱ्या कलाकारांनाही यामधून सोडले जात नाही, असेही दामले या पत्रात म्हटले आहे.
आणखी वाचा- डोंबिवलीत मानपाडा रस्त्यावरील फेरीवाल्यांचा वाहतुकीला अडथळा
नाट्यगृहात मनमानी करणाऱ्या लधवा यांच्यावर कठोर कारवाई करावी. त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याला पदस्थापना द्यावी, अशी मागणी दामले यांनी केली आहे. यासंदर्भात व्यवस्थापक दतात्रय लधवा यांना संपर्क केला. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. परंतु, त्यांच्या एका नियंत्रक अधिकाऱ्याने सांगितले, काही सामाजिक संस्थेतील व्यक्ति नाट्यगृहात नोंद असलेल्या कार्यक्रमांच्या तारखा स्वताला देण्याची मागणी करत आहे. तारखा नोंद असल्याने त्या देता येत नाही, असे लधवा सांगत असतात. त्यामुळे हा विषय पुढे आला आहे. नाट्यगृहात काही गैरव्यवहार होत असतील तर त्याची चौकशी केली जाईल. त्यात तथ्य आढळले तर व्यवस्थापकावर कारवाई निश्चित केली जाईल.