१५ दिवस उलटूनही कारवाई नाही – नगरविकास विभागाकडे तक्रार
डोंबिवली- डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील गोपीनाथ चौकातील सरकारी जमिनीवरील एका बेकायदा इमारतीच्या गच्चीवर भूमाफियांनी सदनिका बांधल्या आहेत. गच्चीवर सदनिका बांधण्याची नवीन पध्दत डोंबिवलीत माफियांनी सुरू केली आहे. बेकायदा बांधकामांचा हा प्रकार वेळीच रोखण्यासाठी गच्चीवरील बांधकामांवर कारवाई करावी म्हणून एका जागरुक रहिवाशाने आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांकडे तक्रारी, स्मरण पत्रे दिली आहेत. तरीही या बेकायदा बांधकामावर कारवाई होत नसल्याने परिसरातील नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
हेही वाचा >>> डोंबिवलीत रिक्षा चालकाच्या घरावर दरोडा
गेल्या आठवड्यात ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे आणि अतिक्रमण नियंत्रण पथक गोपीनाथ चौकातील श्री सद्गुरु प्रसाद बेकायदा इमारतीच्या गच्चीवरील बेकायदा सदनिका तोडण्यासाठी गेले होते. सोबत पोलीस बंदोबस्त होता. पथक १० मिनीट बांधकाम ठिकाणी थांबले आणि कारवाई न करताच माघारी परतले, असे या भागातील नागरिकांनी सांगितले. माफियांनी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणल्यामुळे कारवाई करण्यात झाली नसल्याचे कळते.
आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी बेकायदा बांधकामांवर तक्रार येताच कारवाई करण्याचे आदेश साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. डोंबिवलीतील बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी डोंबिवली परिमंडळासाठी स्वाती देशपांडे स्वतंत्र उपायुक्त नेमण्यात आल्या आहेत. विभागीय उपायुक्त म्हणून सुधाकर जगताप अतिक्रमण नियंत्रण विभागात काम करतात. बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी वरिष्ठ अधिकारी कार्यरत असताना ह प्रभाग साहाय्यक आयुक्त रोकडे यांच्याकडून गच्चीवरील बेकायदा सदनिकेवर कारवाई केली जात नसल्याने या प्रकरणातील तक्रारदार नागरिक कौस्तुभ गोखले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘हे बांधकाम तोडले नाहीतर आपण आयुक्तांपासून समपदस्थ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरविकास प्रधान सचिव सोनिया सेठी यांच्याकडे करणार आहोत,’ असे गोखले म्हणाले.
हेही वाचा >>>कल्याण : सलग तीन दिवस लोकल उशिरा धावत असल्याने प्रवासी संतप्त ; अंबरनाथच्या दरम्यान सोमवारी सकाळी तांत्रिक अडचण
श्री सद्गुरु प्रसाद सोसायटीच्या गच्चीवर बांधकाम सुरू असतानाच आपण तक्रार लावली होती. त्याची दखल हेतुपुरस्सर न घेता. ते बांधकाम साहाय्यक आयुक्त रोकडे यांनी पूर्ण होऊन दिले. यामध्ये काही गडबड आहे, असे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे. अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी गच्चीवरील बेकायदा बांधकामाची गंभीर दखल घेऊन याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्यासाठी आदेशित करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे दाखल केला आहे, असे तक्रारदाराने सांगितले.
गेल्या आठवड्यात उपायुक्त सुधाकर जगताप यांनी बेकायदा इमारतीच्या गच्चीवरील बेकायदा बांधकाम तोडण्याचे आदेश साहाय्यक आयुक्तांना दिले जातील, असे ‘लोकसत्ता’ला सांगितले होते. त्यांचेही आदेश गुंडाळण्यात आल्याने तक्रारदाराने नाराजी व्यक्त केली आहे. गच्चीवरील बांधकाम पाडू नये म्हणून दौलतजादा झाल्याची जोरदार चर्चा देवीचापाडा भागात, माफियांमध्ये सुरू आहे. याविषयी उघडपणे कोणीही बोलत नाही.
प्रभागातील बेकायदा बांधकामे तोडण्याची मोहीम सुरू आहे, असे साहाय्यक आयुक्त रोकडे यांनी सांगितले.
दिवाळी निमित्त झगमगाट
गच्चीवरील बेकायदा बांधकामांच्या चारही बाजुने दिवाळी निमित्त आकाश कंदील, झकपक विजेच्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. रात्री आणि दिवसभर हे दिवे सुरू असतात, असे या प्रकरणातील तक्रारदार गोखले यांनी सांगितले.
“ देवीचापाडा गोपीनाथ चौकातील श्री सद्गुरू प्रसाद इमारतीच्या गच्चीवरील बेकायदा बांधकाम पहिले अनधिकृत म्हणून घोषित केले जाईल. त्यानंतर हे बांधकाम जमीनदोस्त करण्याची कारवाई केली जाणार आहे ”.संदीप रोकडे -साहाय्यक आयुक्त ह प्रभाग अधिकारी डोंबिवली पश्चिम