ठाणे : पावसाळ्यात शहरातील नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने सोमवारपासून शहरातील नालेसफाईच्या कामांना सुरूवात केली आहे. नाल्यातून उचललेला गाळ तत्काळ उचलला जावा आणि त्यामुळे दुर्गंधी पसरू नये, असे स्पष्ट करत ही सर्व कामे मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात पाच प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश ठेकेदारांना देण्यात आले असून या ठेकेदारांनी नालेसफाईची मोहिम सोमवारपासून सुरू केली. आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी कापूरबावडी पोलीस ठाण्यालगत असलेल्या नाल्याच्या सफाईने या मोहिमेचा आरंभ करण्यात आला. नालेसफाईचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जावे. झालेल्या कामाची माहिती दररोज नोंदविण्यात यावी. तसेच, संबंधित अभियंता आणि स्वच्छता निरीक्षक यांनी त्याचा दैनंदिन अहवाल ठेवावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. नाल्यातून उचललेला गाळ तत्काळ उचलला जावा. त्यामुळे दुर्गंधी पसरू नये, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
कापूरबावडी पोलीस ठाण्याजवळील नाले सफाई सुरू केल्यानंतर हरदास नगर येथील नालेसफाईच्या कामास आरंभ करण्यात आला. पाठोपाठ, रेल्वे मार्गालगत, ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ नाल्याच्या सफाईचे काम सुरू करण्यात आले. ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समिती क्षेत्रात छोटे आणि मोठे असे सुमारे २७८ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. पहिल्या टप्प्यात नौपाडा-कोपरी, उथळसर, माजिवडा-मानपाडा, दिवा आणि कळवा या पाच प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले आहेत. तर, दुसऱ्या टप्प्यात, मुंब्रा, लोकमान्य नगर-सावरकर नगर, वर्तक नगर आणि वागळे इस्टेट नालेसफाईचे काम सुरू होणार आहे.
महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांसाठी प्रशासनाने पावसाळ्याच्या दोन महिने आधीच म्हणजेच मार्च महिन्यात निविदा काढल्या होत्या. नौपाडा-कोपरी, उथळसर, माजीवडा-मानपाडा, कळवा, दिवा या पाच प्रभाग समिती क्षेत्रातील निविदा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात होत्या. तर, लोकमान्य-सावरकरनगर, वागळे, मुंब्रा आणि वर्तकनगर या प्रभाग समिती क्षेत्रातील निविदेला प्रतिसाद मिळालेला नव्हता. लोकमान्य-सावरकरनगर, वागळे या दोन समितीत दुसऱ्यांदा तर मुंब्रा आणि वर्तकनगर या दोन समितीत तिसऱ्यांदा निविदेला मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, ठेकेदारांनी आता निविदेला प्रतिसाद दिल्याने नालेसफाईच्या कामांचा मार्ग मोकळा होऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे.