ठाणे : महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा उंचविण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांवर सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असतानाच, त्यापाठोपाठ आता शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सिद्धेश्वर तलाव परिसरातील वस्तीमधून या उपक्रमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. या उपक्रमात झोपडपट्टी परिसर स्वच्छ करण्याबरोबरच येथील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जाणार आहे.
महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा उंचवावा आणि त्यात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्यावे, यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांवर गेल्या काही महिन्यांपासून सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली होती. तेव्हापासून शहराच्या वेगवेगळ्या भागात ठराविक दिवशी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचे संयोजन करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीची जबाबदारी संबंधित सहायक आयुक्त यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तर, सर्व यंत्रणांचा समन्वय करण्यासाठी आयुक्तांच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रभागासाठी एक उपायुक्त नियुक्त करण्यात आलेले आहेत. या मोहिमेत दैंनदिन साफसफाईबरोबरच मोठे आणि अंतर्गत रस्ते यांची सर्वंकष सफाई, पदपथ, रस्ते दुभाजक यांची सफाई करण्यावर भर देण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेला राडारोडा, झाडाच्या फांद्या, कचरा उचलण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय पालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे.
हेही वाचा – खारफुटीवरील भराव रोखण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची मदत
आयुक्त राव यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, या उपक्रमात झोपडपट्टी भागातील अंतर्गत रस्ते, गल्ल्या, अडगळीचे परिसर, गटार सफाई आणि शौचालय यांची साफसफाई केली जाणार आहे. याशिवाय या भागातील अंतर्गत रस्त्यांवर काही ठिकाणी कचरा टाकण्यात येतो. अशा ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. या उपक्रमाची सुरुवात आज, शनिवारपासून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सिद्धेश्वर तलाव भागातील वस्तीमधून होणार आहे.
हेही वाचा – ठाण्यात फेरिवाला क्षेत्र निश्चितीसाठी रस्त्यांचे होणार सर्वेक्षण
शहरातील मुख्य रस्त्यांपाठोपाठ आता शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यात झोपडपट्टी भागातील अंतर्गत रस्ते, गल्ल्या, अडगळीचे परिसर, गटार सफाई आणि शौचालय यांची साफसफाई केली जाणार आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छताविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. – मनीष जोशी, उपायुक्त, ठाणे महापालिका