अक्षरधारा वाचक कट्टय़ावरील चर्चेतील सूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेची जगात सर्वाधिक विक्री होते. त्यांचे ७२ ग्रंथ आणि ४२ खंड प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या एका ग्रंथाच्या ५० लाख प्रतींच्या विक्रीतून शासनाला एक कोटी रुपयांचा नफा झाल्याची माहिती ज्येष्ठ गझलकार व वाचक रमेश अडांगळे यांनी दिली तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य सर्वसमावेशक साहित्य असल्याचे अलियावरजंग संस्थेचे डॉ. त्र्यंबक दुनबळे यांनी सांगितले.
काका गोळे फाउंडेशन व ग्रंथसखा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने काका गोळे खुल्या मंचावर रविवारी सायंकाळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा या विषयावर अक्षरसंध्या वाचक कट्टय़ावर अनेक वाचकांनी आपली मते मांडली. त्या वेळी बोलताना रमेश अडांगळे व डॉ. त्र्यंबक दुनबळे यांनी वरील माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. त्र्यंबक दुनबळे यांनी केले तर प्रास्ताविक संदीप साखरे यांनी केले. विश्वास जोशी यांनी आभार मानले.
बाबासाहेबांच्या साहित्यावर बोलताना दुनबळे म्हणाले की, जाती-धर्मातील भेदाभेद विसरून एक भारतीय माणूस म्हणून काम केले तरच देश विकसित होईल ही भावना मनात ठेवून बाबासाहेबांनी कार्य केले. त्यांना संगीताची प्रचंड आवड होती, परंतु इच्छा असूनही ते वेळेअभावी संगीत शिकू शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले.