प्रकल्पाच्या कायदेशीर मान्यतांचा तपशील जाहीर करण्याचे बिल्डरांवर बंधन
एखाद्या इमारतीत किंवा गृहसंकुलात घर नोंदवताना या गृहप्रकल्पाला संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम परवानगी मिळाली आहे का, इमारतीला जोता प्रमाणपत्र मिळाले आहे का तसेच संपूर्ण प्रकल्पाला भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे का, असे प्रश्न ग्राहकांच्या मनात अनेकदा रुंजी घालतात. मात्र बिल्डरकडून दाखविल्या जाणाऱ्या कागदपत्रांच्या फेर पडतळाणीचा मार्गच ग्राहकांना उपलब्ध नसतो. आता मात्र ग्राहकाच्या हक्काचे रक्षण व्हावे यासाठी त्याला प्रकल्पाच्या मंजुरीची सद्यस्थिती एका क्लिकवर मिळणार आहे. बांधकाम परवानगी मिळालेल्या सर्व प्रकरणांची यादी संबंधित नियोजन प्राधिकरणांनी त्यांच्या संकेतस्थळावर दर आठवडय़ाला प्रसिद्ध करावी, असा आदेशच नगर विकास विभागाने काढला आहे.
विशेष म्हणजे, मान्यताप्राप्त प्रकरणात त्रयस्थ व्यक्तिंना मंजुरीपत्रे पडताळण्याची मुभा देण्याचेही महापालिकांना बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशामुळे शहर विकास विभागामार्फत एखाद्या प्रकल्पांना वेगवेगळ्या मान्यता देत असताना राबविल्या जाणाऱ्या प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण होण्याची शक्यता असून बिल्डर, वास्तुविशारद आणि शहर विकास विभागातील ठराविक अधिकाऱ्यांच्या ‘गुपचूप’ कारभाराला पायबंद बसू शकणार आहे.
ठाणे, कल्याण डोंबिवली तसेच आसपासच्या शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहिली असून तेथे स्वस्त दरांत घर मिळत असल्याने घरे घेणाऱ्या हजारो नागरिकांची फसगत झाल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. नियोजित गृहप्रकल्पांच्या जाहिरातींना फसून सदनिका नोंदविणाऱ्या ग्राहकांना या प्रकल्पास प्रत्यक्षात शासकीय मंजुऱ्या मिळाल्या आहेत की नाहीत, मिळाल्या तर त्या किती आहेत, मागितलेल्या मंजुऱ्यांची सद्यस्थिती काय, हे समजण्यास मार्ग नसतो. त्यामुळे बिल्डरने दाखविलेल्या कागदपत्रांवरच विसंबून रहावे लागते. या कागदपत्रांची फेरपडताळणी कोठून करावी याविषयी पुरेशी माहिती नसते. या पाश्र्वभूमीवर नगरविकास विभागाने काढलेल्या या आदेशामुळे ग्राहकांना घरबसल्या ही माहिती मिळू शकणार आहे. अनेकदा ‘माहिती अधिकारात’ही या प्रकल्पांच्या मंजुऱ्यांच्या सद्यस्थितीबाबत माहिती देण्यात चालढकल, टाळाटाळ किंवा वेळकाढूपणा केला जातो. आता मात्र संकेतस्थळावरून थेट ही माहिती दर आठवडय़ाला अद्ययावत होणार असल्याने ग्राहकांचे सुरक्षित घरखरेदीचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे.
घरखरेदी निर्धोक होणार!
प्रकल्पाच्या कायदेशीर मान्यतांचा तपशील जाहीर करण्याचे बिल्डरांवर बंधन
Written by जयेश सामंत

First published on: 22-04-2016 at 01:11 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Compulsory to builders announce project details