एकीकडे मराठी शाळांना उतरती कळा लागल्याचे वास्तव समोर येत असताना कल्याणातील बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेने ७५० विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र संगणक कक्ष उभारला आहे. शिक्षक पालक संस्थेच्या सहकार्याने शाळेत वीस संगणक असलेला स्वतंत्र कक्ष कार्यान्वित झाला आहे.
दिवसेंदिवस मराठी शाळांची पटसंख्या कमी होऊ लागली आहे. या पाश्र्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानात मराठी शाळा कुठेही कमी पडत नाहीत, हे दाखवून देण्यासाठी हे केंद्र साकारण्यात आले आहे. बहुतेक मराठी शाळांमध्ये प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र संगणक कक्ष नसतो. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळेच्या संगणक कक्षावर समाधान मानावे लागते. बालक मंदिर शाळेने मात्र वीस संगणक असलेला कक्ष विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक संगणकावर दोन अशा पद्धतीने चाळीस विद्यार्थी एकावेळी या केंद्राचा लाभ घेऊ शकतील, अशी माहिती शिक्षक विलास लिखार यांनी दिली.
विद्यार्थ्यांना संगणकाच्या प्रत्येक भागाची इत्थंभूत माहिती मिळावी यासाठी खास माहितीपूर्ण फ्लेक्सही बनवले आहेत. संगणक कक्षातील संगणकावर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना एम. एस. ऑफिस शिकविण्यात येणार आहे, तर तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना इंटरनेटची मूलभूत माहिती देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संगणक कक्षात मोठय़ा पडद्यावर अभ्यासाव्यतिरिक्त सामान्य ज्ञान, गड किल्लेविषयक माहिती, संतांचे कार्य, ऐतिहासिक घडामोडी, प्राणी, पक्ष्यांचे फोटो आदी गोष्टी दाख्विण्यात येणार आहेत. स्वतंत्र संगणक कक्षाबरोबरच शाळेत ‘इ-लर्निग’ सुरू करण्यात येणार आहे. यात अ‍ॅनिमेशन, ग्राफिक्सच्या साहाय्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी माध्यम शाळेच्या विद्यार्थी संख्येमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढावी व विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय शाळांसारखा मराठी शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो.
– प्रसाद मराठे, अध्यक्ष,
शालेय समिती बालक मंदिर संस्था प्राथमिक शाळा

बाहेरच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी असे नवनवीन उपक्रम करणे गरजेचे आहे. अशा नवनवीन उपक्रमातून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन होण्यास मदतच होईल. नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने असे उपक्रम राबवून आमच्या शाळेत आम्हाला ज्ञानदेव निर्माण करायचे आहेत.
– कल्पना पवार, मुख्याध्यापिका,
बालक मंदिर संस्था प्राथमिक शाळा

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Computer room for 750 students