एकेकाळी नैसर्गिक साधनसंपत्ती आणि वनराईने दाटलेल्या मुंबई, ठाण्यात आता काँक्रीटचे जंगल तयार झाले आहे. जागोजागी उभ्या रहात असलेल्या इमारतींच्या भाऊगर्दीत हिरवाई उरली ती केवळ शोभेपुरतीच. पण काँक्रिटच्या या जंगलातही निसर्गाचा सहवास लाभून देणारे अनेक वृक्ष, वेली शहरांत दिसून येतात. या मानवनिर्मित जंगलाची तमा न बाळगता निसर्गाचं लेणं अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या अशाच हिरवाईवर प्रकाश पाडणारी ही विशेष साप्ताहिक लेखमाला..
वसंत ऋतूची चाहूल लागली की संवेदनशील मन निसर्गातील अद्भुत अशा रंगांच्या उधळणीचे वेध घेऊ लागते. शहरात काँक्रीटच्या जंगलातही त्याची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही. त्याचे अगदी ठळक उदाहरण म्हणजे बहावा. ठाण्यापासून बदलापूपर्यंत जवळपास सर्वच शहरांमध्ये सध्या रस्त्यालगत, बागेमध्ये बहाव्याची सोनेरी उधळण आपल्याला पहायला मिळते. पिवळ्याधम्मक सोनेरी रंगांची झुंबरे झुलवत फुललेला बहावा पाहणे खूपच आनंददायी असते. उष्णता जितकी जास्त, तितका बहावा अधिक जोमाने फुलतो. थंडी असली तर मात्र त्याचे फुलणे लांबणीवर पडते. यंदा अधूनमधून अवकाळी पावसाच्या सरी कोसळत असल्याने बहाव्याला अजूनही फुलावे की फुलू नये अशा संभ्रमात टाकले आहे. तरीही विशेषत: अंबरनाथ, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली परिसरांत बहाव्याला आता उशिराने का होईना बहर येऊ लागला आहे. या शहरांमध्ये रेल्वे स्थानकालगत, रस्त्यांच्या कडेला सहज नजर टाकली तरीही बहाव्याचा सोनेरी फुलोरा सध्या दिसतो. बदलापूरमधील बहाव्याची झाडे मात्र अजूनही फुलण्यासाठी उष्णतेच्या प्रतीक्षेत आहेत.
बहाव्याचे शास्त्रीय नाव – cassia fistula ( कॅशिया फिस्तुला) असून तो fabaceae (फॅबेसी) या वनस्पती कुलातील आहे. हिंदीमध्ये अमलतास, इंग्रजीमध्ये golden shower plant (सोनेरी रंग उधळणारा वृक्ष) किंवा indian labaurnum अशा विविध नावांनी तो ओळखला जातो. मूळच्या भारतीय उपखंडातीलच असलेल्या या वृक्षाची लागवड मुख्यत्वेकरून बागेत अथवा रस्त्यालगत शोभेसाठी करण्यात येते.
बहावा हा मध्यम उंचीचा वृक्ष असून त्याची फुले मनमोहक पिवळ्या रंगांची असतात. एका दांडीवर ही फुले खालपासून वपर्यंत फुललेली दिसतात. त्यामुळे सोनेरी झुंबर उलटे लटकून ठेवल्याचा भास होतो. कळ्या खालच्या दिशेला आणि उमललेली फुले वरच्या दिशेला अशी त्यांची मनमोहक रचना असते. पूर्णपणे फुललेल्या फुलांचे फुलपाखरे, मधमाशा आणि कीटक परागीभवन करतात. नंतर याला शेंगा लागतात. कालांतराने या शेंगा काळ्या होतात. आडवे पट्टे असलेल्या शेंगांच्या कप्प्यांमधील गरामध्ये बिया पहुडलेल्या असतात. बहाव्याच्या खोडापासून इमारतीचे लाकूड मिळते. कातडी कमाविण्यासाठी या झाडाच्या सालीची उपयोग होतो. शेंगेतील गर औषधी आहे. काविळीसारख्या आजारात तो गुणकारी ठरतो. त्याची पाने त्वचारोग बरा करण्यासाठी, त्वचादाह शमविण्यसाठी वापरतात. आम्लपित्त कमी करण्यासाठीही बहाव्याचा गर उपयुक्त आहे. बहाव्याचा हा सोनेरी बहर पाहण्यासाठी आपल्याला लांब जंगलात जाण्याची आवश्यकता नाही, कारण शहरीकरणाच्या रेटय़ातही वसंत ऋतूच्या श्रीमंतीची चुणूक दिसते. निसर्गाचे आपण कळत-नकळतपणे बरेच नुकसान करीत असलो तरी तो मात्र ‘देता किती घेशील दोन कराने’ या न्यायाने स्वच्छ मनाने आपल्याला भरभरून देत असतो. निसर्गाच्या या दातृत्वाची प्रचीती सध्या बहाव्याच्या रूपाने पहायला मिळते. आपणही निसर्ग आणि बहावा याचे ‘हात’ घेऊन आनंदी होऊया..
बहाव्याचा सन्मान
केरळ राज्यात राज्यफूल म्हणून बहाव्याचा सन्मान करण्यात आला आहे. तिथे ‘विशू’ या सणाच्या दिवशी पूजेसाठी बहाव्याची फुले वापरतात. तसेच थायलंडमध्ये बहाव्याला राष्ट्रीय वृक्षाचा आणि त्याच्या फुलांना राष्ट्रीय फुलांचा दर्जा देण्यात आला आहे.
डॉ. मनीषा कर्पे
(डॉ. मनीषा कर्पे रुईया महाविद्यालयात सूक्ष्म जीवशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. ठाणे जिल्ह्य़ात आढळणाऱ्या वृक्षांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे.)