लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: डोंबिवलीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय ते घरडा सर्कल रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘सीबीटी’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन बांधणी सुरू केली आहे. कमी वेळात गुणवत्तापूर्ण काँक्रीट रस्ता बांधणीचे काम या तंत्रज्ञानातून केले जाते.
आर. आर. रुग्णालय, पेंढरकर महाविद्यालय ते घरडा सर्कल १५० ते २०० मीटरचा रस्त्याचा पट्टा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. या रस्त्यावर महिनाभरात खड्डे पडून या रस्त्यावरुन वाहने चालविणे अवघड झाले होते. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्याने कल्याण डोंबिवली पालिकेला या रस्त्यावरील खड्डे बुजविणे शक्य होत नव्हते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिकेच्या ठेकेदाराकडून या रस्त्यावर खडी टाकून खड्डे तात्पुरते बुजविण्याची कामे केली जात होती.
आणखी वाचा-कल्याण-डोंबिवलीत खड्डे भरणीच्या कामांना वेग
डोंबिवलीतील सर्वाधिक वर्दळीच्या पेंढरकर महाविद्याल ते घरड सर्कल रस्त्याची दुरवस्था होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग या महत्वपूर्ण रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांकडून समाज माध्यमांवर टीका केली जात होती. मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी या रस्त्याचे काम बांधकाम विभागाने तातडीने हाती घेतले नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या खात्याच्या अंतर्गत हा रस्ता असुनही बांधकाम विभाग हा रस्ता तयार करण्यास का पुढाकार घेत नाही, असाही नागरिकांच्या टिकेचा सूर होता. या रस्त्यावरील खड्डयांमुळे मंत्री चव्हाणही टिकेचे लक्ष्य झाले होते. मंत्र्यांच्या शहरातील रस्ता सुस्थितीत असला पाहिजे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्याधुनिक सीबीटी तंत्रज्ञानातून आर. आर. रुग्णालय ते घरडा सर्कल रस्ता बांधणीचे काम हाती घेतले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानातील हा रस्ता पाहण्यासाठी प्रवासी, पादचारी, रस्ते अभ्यासक यांची गर्दी या भागात होत आहे.
आणखी वाचा- लोकल ट्रेनमध्ये शिरायला जागा मिळत नसल्याने महिला थेट मोटरमनच्या केबिनमध्ये
सीबीटी तंत्रज्ञान
या तंत्रज्ञानात मूळ रस्ता दीड ते दोन फूट खोदला जातो. त्यानंतर अत्याधुनिक अवजड यंत्रांच्या साहाय्याने खोदकाम मार्गिकेत बारीक खडीचे थर दाबण्याचे काम केले जाते. तीन ते चार थरानंतर पृष्ठभागापर्यंत थर आल्यानंतर यंत्राच्या साहाय्याने काँक्रीटीकरणाचे काम यंत्राच्या साहाय्याने केले जाते. हा काँक्रीटचा रस्ता तयार केल्यानंतर चार ते पाच तासानंतर वाहतुकीसाठी तात्काळ खुला केला जातो.
याच रस्त्याच्या बाजुला एमएमआरडीएच्या रस्त्यांची कामे एमआयडीसी भागात करण्यात आली आहेत. हे रस्ते खोदकाम न करता आल्याने या रस्त्यांची उंची दीड ते दोन फूट उंच झाली आहे. या रस्त्यांमुळे आजुबाजुच्या सोसायट्या, बंगले रस्त्यापासून खाली आणि रस्ते वर असे चित्र आहे. या रस्त्यांविषयी रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.