खड्डे, धुळीने भरलेले रस्ते पहिले सुस्थितीत करा म्हणून गेल्या काही महिन्यांपासून नागरिक टाहो फोडत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरात येणार आहे कळताच डोंबिवली एमआयडीसीतील, मुख्यमंत्री जाणार असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे जोमाने सुरू केली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मार्गात एकही खड्डा, धुळीने भरलेला रस्ता येणार नाही अशाप्रकारची आखणी करुन खड्डे भरणीची कामे सुरू करण्यात आली आहेत.
हेही वाचा >>>कळवा नवीन खाडी पुलासह शीळ उड्डाणपुलाच्या लोकार्पणास मुहूर्त मिळला
डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. या रस्त्यांवरुन वाहन गेल्यावर धुळीचे लोट उडत आहे. एमआयडीसी निवासी विभागात सर्वाधिक शाळा, रुग्णालये आहेत. रहिवाशांबरोबर विद्यार्थी, पालकांना खड्डे, धुळीचा त्रास होत आहे. याची पर्वा गेल्या सहा ते सात महिन्यात एमआयडीसी, पालिका अधिकाऱ्यांनी केली नाही. अनेक नागरिकांनी एमआयडीसी, शहरातील रस्ते सुस्थितीत करा म्हणून पालिका, एमआयडीसीला पत्रे, आंदोलन, उपोषणे करुन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तरही त्याकडे लक्ष न देणारे अधिकारी मुख्यमंत्री येणार म्हणून कामाला लागल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा >>>मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने डोंबिवलीत रविवारी किलबिल महोत्सव
उद्घाटनांचे देखावे कमी करा
फेब्रुवारी महिन्यात माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डोंबिवली एमआयडीसीतील ११० कोटीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामांचे भूमिपूजन करण्यात आले होते. या भूमिपूजन कार्यक्रमात ही कामे खूप गतीने होतील. यासाठी खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी चांगले नियोजन केले आहे, असे कौतुक नगरविकास मंत्री आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमात केले होते. फेब्रुवारीमध्ये भूमिपूजन केलेल्या अडगळीतील १५० मीटर रस्त्याव्यतिरिक्त एक इंचही काम पुढे गेलेले नाही. त्यामुळे नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. आपल्या मर्जीतल्या ठेकेदाराला काम दिल्याने हे काम रेंगाळले आणि त्याच्याकडून हे काम नंतर काढून टाकण्यात आल्याचे समजते.
पहिले चांगली रस्ते कामे करा मग त्याची उद्घाटने जोरात करा. अगोदर भूमिपूजनाचे देखावे उभे करुन नागरिकांना फक्त झुलवत ठेवण्याचे काम गेल्या वर्षापासून सुरू आहे, अशी टीका डोंबिवली एमआयडीसी, शहरी भागातील नागरिकांकडून केली जात आहे.
गोपाळकाला, नवरात्रोत्सव काळात मुख्यमंत्री रात्रीच्या वेळेत डोंबिवलीत आले होते. त्यावेळीही २४ तास राबून अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री मार्गातील रस्ते सुस्थितीत केले होते. मंत्री आले की रस्ते होणार असतील करदाते नागरिकांचा विचार कोण आणि कधी करणार असा प्रश्न संतप्त नागरिक करत आहेत.
४४५ कोटी रस्ते भूमिपूजन
कल्याण लोकसभा मतदारसंघातील ४४५ कोटीच्या रस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने रविवारी आयोजित केला आहे. यावेळी पालिका क्षेत्रातील ३६० कोटी, एमआयडीसी निवासी विभागातील ५७ कोटी, सागाव मानपाडा रस्त्यासाटी २७ कोटी रस्ते कामांचे भूमिपूजन केले जाणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण असुनही त्यांना या कार्यक्रमात कोठेही स्थान नाही. हा पक्षाचा कार्यक्रम असल्याचे पदाधिकारी सांगतात. मंत्री चव्हाण यांनी डोंबिवली, कल्याण शहरांसाठी ४७२ कोटीचा निधी मंजूर करुन आणला आहे. त्या रस्त्यांचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांनी करुन शहरवासीयांना दिलासा देणे आवश्यक होते, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.