कल्याण- मागील काही वर्षांपासून कल्याण, डोंबिवली शहर परिसरात लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अल्पवयीन मुली या घटनांमुळे अस्वस्थ होऊन आत्महत्या करत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी तरुण, तरुणींसाठी समुपदेशक कार्यशाळा घेणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक संस्थेच्या मदतीने पोलिसांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापक अध्यक्षा व सनदी लेखापाल जयश्री कर्वे, ॲड. तृप्ती पाटील यांनी कल्याणचे साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्याकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीतील विको नाक्याला हातगाड्यांचा विळखा, मालवाहू वाहनांना कोंडीचा फटका

प्रेमप्रकरण, लग्नाचे आमिष दाखवून तरुणींची लैंगिक भावनेसाठी फसवणूक केली जात आहे. मेजवानीच्या बैठकींमध्ये तरुणांकडून आपल्या सहकारी मैत्रिणीवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. या सगळ्या प्रकारांमुळे पोलिसांचा सामाजिक परिस्थितीवर वचक आहे की नाही, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. या विकृत तरुणांच्या वाढत्या उद्दामगिरीला कायद्याने आळा घालणे गरजेचे आहे. त्याच बरोबर समाजाला आश्वस्त करणे, समाजाचे मनोबल वाढविणे आता गरजेचे आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. माहिती व तंत्रज्ञानातील प्रगती तसेच समाज माध्यामांमुळे तरुण, तरुणींची समजण्याची जाणीव प्रगल्भ झाली आहे.

हेही वाचा >>> भाईंदर: खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने खेळाडूचा मृत्यू

अशाही परिस्थितीत तरुणींना आपल्या लैंगिक भावनांसाठी जाळ्यात ओढणे, तिची प्रेमभावनेतील छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देणे, या अस्वस्थतेमधून तरुणीने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलणे. हे प्रगल्भ समाजासाठी शोभादायी नाही. त्यामुळे शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी वर्गांमधुन पोलीस, सामाजिक महिला संस्था यांच्या पुढाकाराने जागृती शिबीरे आयोजित केली पाहिजेत. स्व संरक्षणासाठी कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत. प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक संरक्षण कायद्याची समिती आहे की नाही, याची खात्री करणे. मुलांना लैंगिक अत्याचार संदर्भातील कायद्यांची ओळख करुन देणे. हे विषय आता हाताळणे खूप गरजेचे आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या समुपदेशन, जागृती उपक्रमासाठी पोलिसांना डोंबिवली महिला महासंघ संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन महासंघाच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री कर्वे यांनी पोलिसांना दिले आहे. या महासंघामध्ये अध्यक्षा प्रा.डॉ. विंदा भुस्कुटे, उपाध्यक्ष नेत्रा फडके, सुनीती रायकर, ॲड. मनीषा तुळपुळे यांचा सहभाग आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conduct counseling camps in schools to prevent sexual harassment dombivli mahila mahasangh zws
Show comments