ठाणे : कोपरी येथे सिद्धेश अभंगे फाऊंडेशन या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यात आयोजक आणि संघामध्ये तुफान राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आयोजक सिद्धेश अभंगे याच्यासह इतर सहा ते सात जणांविरोधात क्रिकेट संघातील खेळाडूंनी तक्रार दाखल केली. सिद्धेश अभंगे याच्या समाजमाध्यमांवरील खात्यावर तो शिवसेनेच्या (शिंदे गट) युवासेनेचा पदाधिकारी असल्याचे नमूद आहे. आयोजकांमार्फतही संघाच्या काही खेळाडूंविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार कोपरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

कोपरी येथील मैदानात २ ते ५ फेब्रुवारी या दरम्यान सिद्धेश अभंगे फाऊंडेशन तर्फे क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामान्यावेळी क्रिकेट संघातील काही खेळाडूंचे आयोजकांनी दिलेल्या निर्णयावरून वाद झाले. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. दरम्यान, घटनेची माहिती कोपरी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आयोजक आणि खेळाडूंना ताब्यात घेतले. याप्रकरणी दोन्ही गटाविरोधात धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर गुन्हे दाखल झाले आहेत. सिद्धेश अभंगे याच्या समाजमाध्यमावरील खात्यावर तो शिंदे गटाच्या युवासेनेचा पदाधिकारी असल्याचा उल्लेख आहे.

Story img Loader