ठाण्यावरून सुटणाऱ्या ७.४५ बदलापूर रेल्वे गाडीच्या ऐवजी मुंबई दिशेकडे जाणारी ७.३५ गाडी लावल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडला आहे. ठाणे स्थानकात फलाट क्रमांक ३ आणि ४ वर प्रवाशांची गर्दी उसळली होती. ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज पाच ते सहा लाख प्रवासी प्रवास करतात. ठाणे स्थानकातून बदलापूर, कर्जत कसारा कडे जाणाऱ्या प्रवाशाची संख्या अधिक आहे.
हेही वाचा >>> कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे जल्लोष
या प्रवाशांकरीता सायंकाळच्या वेळेत ठाण्यावरून काही विशेष लोकल गाड्या सोडण्यात येतात. यामध्ये फलाट तीनवर ७ वाजून ४५ मिनिटांची बदलापूर लोकल असते. तसेच फलाट चार वरून मुंबई दिशेकडे जाणाऱ्या धीम्या लोकल गाड्या प्रवास करतात. मात्र मंगळवारी रात्रीच्या सुमारास फलाट तीन वरून कोणतीही सूचना दिली नसताना, मुंबई दिशेकडे जाणारी ७ वाजून ३५ मिनिटांची लोकल गाडी लावण्यात आली. रोजच्या वेळेत बदलापूर कडे जाणाऱ्या प्रवाशांमध्ये यामुळे संभ्रम निर्माण झाला. अचानक बदललेल्या वेळापत्रकामुळे ठाणे स्थानक फलाट तीन आणि चार वर प्रवाशांची गर्दी उसळली.