भाईंदर : ठाणे लोकसभा जागेसाठी महायुतीचा उमेदवार निश्चित होत नसल्यामुळे भाजप- शिवसेना पक्षांअंतर्गत संभ्रम वाढू लागला आहे. त्यामुळे शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवशी मिरा भाईंदर शहरातील प्रचार थंडावल्याचे दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतरही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटू शकलेला नाही. शिवेसना आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून ठाणे मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे. भाजपाने दावा करून संजीव नाईक यांचे नाव पुढे केले होते. त्यांनी प्रचारदेखील सुरू केला होता. नंतर शिवसेनेतर्फे प्रताप सरनाईक यांचे नाव समोर आले. पण त्याची देखील अधिकृत घोषणा झाली नाही. दोन्ही पक्षांच्या या रस्सीखेचामुळे मिरा भाईंदर शहरातील महायुतीचा प्रचार थंडावला आहे. शनिवार रविवारी तर शहरात कुठेही प्रचार मेळावे, सभा आयोजित करण्यात आलेले नव्हते.. सुरवातीला नरेंद्र मोदी यांना उमेदवार समजून प्रचार करण्यात येत होता. मात्र आता उमेदवाराबाबत एवढी अनिश्चितता निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला आहे. परिणामी महायुतीचा प्रचार थंडावत गेला.

आणखी वाचा-मिरा-भाईंदरमध्ये भीषण पाणीटंचाई; दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद, नागरिकांचे हाल

महाविकास आघाडी जोरात..

महायुतीचा उमेदवार ठरत नसल्याने त्यांचा प्रचार थंडावला असला तरी दुसरीकडे हाविकास आधाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी हा मतदार संघ पिंजून काढला असून अन्य पक्षातील नाराज उमेदवारांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा सुरु ठेवला आहे. महायुती मध्ये उमेदवारीवरून सुरु असलेल्या वादामुळे अंतर्गत गटातटाचे राजकारण महायुतीला हानीकारक ठरू शकेल अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहे.

…तर भाजपाच्या स्थानिकांना करावा लागणार सरनाईकांचा प्रचार

ठाणे लोकसभेसाठी भाजपातून इच्छुक असलेल्या संजीव नाईक यांनी मागील वर्षभरापासून मिरा भाईंदर, ठाणे आणि नवी मुंबई मधील कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेतून आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, आणि नरेश मस्के हे इच्छुक असल्याचे समजते. प्रताप सरनाईक आणि भाजपाच्या एका गटात वाद आहे. मात्र त्यांची उमेदवारी जाहीर झाली तर भाजपाच्या स्थानिक नेत्यांना त्यांच्या प्रचारात उतरावे लागणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion continued in thane lok sabha seat the mahayutis campaign stopped down due to candidate uncertainty mrj