ठाणे : वागळे इस्टेट येथील परबवाडी भागात भाजपच्या पदाधिकाऱ्याला जमावाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला होता. हा हल्ला शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप भाजपच्या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी केला होता. या मारहाण प्रकरणाचे सीसीसीटीव्ही चित्रीकरण समोर आले असून त्या आधारे पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी ठाणे भाजपा कडून केली आहे. यासाठी भाजपाचे आमदार संजय केळकर निरंजन डावखरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी शनिवारी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात भेट दिली. यावेळी जमलेल्या भाजपा कार्यकर्ते आणि महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला.
भाजपचे पदाधिकारी प्रशांत जाधव आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील काही जणांचा फलक बसविणाऱ्यावरून वाद झाला होता. याप्रकारानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज दिला होता. मात्र शुक्रवारी सायंकाळी अचानक १५ ते २० जणांचा जमावाने प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर ठाण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांनी केल्याचा आरोप केला आहे. त्यांसदर्भाचे ट्विटही ‘भाजप ठाणे’ या खात्यावरून करण्यात आले आहे.
या मारहाण प्रकरणाचे सीसीटीव्ही चित्रीकरण समोर आले आहे. या चित्रीकरणात प्रशांत जाधव यांना काही जण मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. या आधारे पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी ठाणे भाजपा कडून केली जात आहे. यासाठी भाजपाचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी शनिवारी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात भेट दिली. यावेळी निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांनी पोलिसांना सीसीसीटीव्हीमध्ये मारहाण करणाऱ्यांचे चेहरे स्पष्ट दिसत असल्याने त्यांच्यावर लागलीच गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करावी अशी मागणी यावेळी पोलिसांजवळ केली.
तसेच पोलीस प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे असे पोलिसांना यावेळी सांगितले. तर जो पर्यंत संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातच बसून राहण्याच्या इशारा यावेळी भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी दिला. या संपूर्ण प्रकरणामुळे ठाण्यात शिंदे गट आणि भाजपामधील वाद विकोपाला जात असल्याची चिन्ह दिसून येत आहे.